प्रेरणा : फुलबसनबाईची बाग 

दत्तात्रय आंबुलकर 

शैक्षणिकदृष्ट्या 5 वी पास व वयाच्या केवळ 10 व्या वर्षी विवाहित झालेल्या छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील फुलबसनबाईंनी आपल्या कार्यकर्तृत्वाने त्या परिसरात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले असून अनेक महिला आणि महिला गटांना प्रेरित-प्रोत्साहित करण्याचे महनीय काम केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुलबसनबाईच्या कामाच्या प्रवासाची सुरुवातच मुळी मोठ्या आगळ्यावेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण व आव्हानपर परिस्थितीत झाली. नक्षली-माओवाद्यांचा आक्रमक गड समजल्या जाणाऱ्या त्या परिसरात वयाच्या केवळ 11 व्या वर्षी त्यांना “बाजार-ठेका’ म्हणजेच आठवडे बाजारात दुकान थाटणाऱ्यांकडून पावती-पैशाची वसुली करण्याचे काम सुरू केले व असे काम करणाऱ्या त्या पहिल्या आणि त्यावेळच्या एकमेव महिला ठरल्या हे विशेष.

हे काम सुरू करतानाच दुकानदार-ठेकेदारांची मनमानी व दंडेली पाहून फुलबसनबाईंना हे काम एका महिलेचे नाही याची अल्पावधीतच जाणीव झाली व त्यांनी आपल्या काही महिला सहकाऱ्यांना आपल्यासह घेतले व सामूहिकपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यांची ही मात्रा फळाला आली व उर्मट दुकानदार वठणीवर येऊन सहकार्य करते झाले. आपल्या या महिला सहभाग आणि सहकार्याच्या प्रयोगाला अशा प्रकारे यश आलेले पाहून फुलबसनबाईंनी विभिन्न गावातील महिलांना आपापल्या गावी अशा प्रकारचे काम करण्यास प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. इतर महिलांच्या यशस्वी प्रतिसादानंतर यातूनच औपचारिक स्वरुपात महिला स्वयंसहाय्यता गटांची स्थापना झाली.

या गटांचे काम वाढू लागले व अधिकाधिक संस्थेत महिला त्यामध्ये सामील होत गेल्या. लवकरच यातून छत्तीसगडच्या राजनांदगाव विभागातील ग्रामीम व वनवासी महिलांनी मां बांकेश्‍वरी जागृती कार्य समिती या महिलांच्या स्वयंसेवी संस्थेची औपचारिक स्वरूपात स्थापना केली व या संस्थेअंतर्गत 13000 महिला स्वयंसहायता गट विविध प्रकारची कामे करीत असून त्यामध्ये लाखोच्या संख्येत महिला सहभागी होत आहेत. फुलबसनदेवी यादव व त्यांच्या अन्य महिला सहकारी औपचारिकदृष्ट्या शिक्षित नसल्या तरी त्यांचा वैचारिक-व्यावसायिक आवाका व समाजसेवेचे भान तिर कुणापेक्षा अजिबात कमी नाही. याचे मुख्य व अनुकरणीय उदाहरण म्हणजे संसेथने आजवर राजनांदगाव जिल्ह्यातील सुमारे 50 गावांना आपल्या सदस्य महिलांच्या सहकार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छ ग्राम व हगणदारीमुक्त केले आहे.

या महिलांच्या या यशस्वी कार्यकर्तृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये कधीही व कुठल्याही स्वरूपात सरकारची मदत घेतली नसून सारी कामे केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर स्वखर्चाने वा गाववर्गणीतून केली आहेत हे विशेष. त्यांच्यामते चांगल्या व गावकीच्या भल्यासाठी समाज सहजतेने मदत करण्यास पुढाकार घेतो व त्यासाठी पैशाची कमतरता कधीच भासत नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विविध ठिकाणच्या ग्रामीण महिलाच नव्हे तर मोठमोठे सरकारी अधिकारी-पुढारीसुद्धा प्रभावित होतात. यातूनच फुलबसनदेवींना त्यांच्या या उल्लेखनीय पुढाकार आणि यशस्वी कामासाठी विविध पुढाकार देण्यात आले असून त्यामध्ये त्यांना 2012 मध्ये मिळालेल्या “पद्मश्री’ या सर्वश्रेष्ठ पुरस्काराचा पण समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)