#प्रेरणा: जिल्हा परिषद अध्यक्षांचा आशादायी उपक्रम 

दत्तात्रय आंबुलकर 

समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरावेत यासाठी त्यांच्या बॅंक खात्यात ठराविक कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवून या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा अभिनव व आशादायी सामाजिक उपक्रम बेळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आशा डोहोळे यांनी यशस्वीपणे राबविला आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध पंचायत समिती कार्यक्षेत्रातील 20 अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आशा डोहोळे यांनी दत्तक घेतले आहे. आशाताईंनी या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये 10 वर्षांसाठी कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवले आहेत. या रकमेचा वापर या विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण वा स्वयंरोजगारासाठी केला जाणार आहे.

-Ads-

तसेच बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या सुधारणेसाठीही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी शाळांच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, शिक्षकांशी चर्चा करून योगदान देण्याचे जे आवाहन आशाताईंनी केले आहे त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याद्वारे शाळेतील आजी विद्यार्थ्यांना मदत-मार्गदर्शन तर माजी विद्यार्थ्यांना कर्तव्यपूर्तीचे मनस्वी समाधान मिळत आहे.

आपल्या या आगळ्या उपक्रमांना साजेशा स्वरूपात गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याच्या योजनेस आशाताईंनी “आशा किरण’ असे तर सरकारी शाळा सुधारणा योजनेला “शाळा संजीवनी’ असे सार्थ नाव दिले आहे. आशाताईंचे मूळ कार्यक्षेत्र असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील उगार बुद्रुक या गावापासून या योजनांचा सक्रिय शुभारंभ करण्यात आला. उगार बुद्रुक गावातील सरकारी कन्नड शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्मार्ट क्‍लास स्थापन करण्यात आला. 160 वर्षांची परंपरा लाभलेल्या या शाळेचे माजी विद्यार्थी व तालुका पंचायत समिती सदस्य वसंत खोत यांनी या शाळेसाठी एक खोली बांधून दिली आहे.

गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शासन-प्रशासनाची वाट पाहात बसण्यापेक्षा स्वतःकडून पुढाकार घेऊन शक्‍य ती मदत करण्याचा निर्धारच आशाताईंनी व्यक्‍त केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी बेळगावच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना जी गंभीर बाब लक्षात आली ती म्हणजे जिल्ह्यातील मोठ्या संख्येतील गोरगरीब विद्यार्थी पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 7 वी वा 8 वी नंतर शाळा सोडून देतात व त्यांचे शिक्षण खंडित होते. त्यानंतर त्यातील अल्पवयीन विद्यार्थिनींना तर प्रसंगी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्नाच्या बंधनात अडकविण्यात येते. आशाताईंनी तातडीने कार्यवाही करून 20 गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे.

आशा डोहोळे यांच्या या सामाजिक उपक्रमांतर्गत नजीकच्या भविष्यात बेळगाव जिल्हा परिषदेतील सर्वच म्हणजे 90 मतदारसंघातील किमान एका गरीब व गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपला मदतीचा हात पोहोचविण्याचा संकल्पच त्यांनी सोडला असून त्यांच्या या प्रयत्नांना जिल्ह्यतील सर्वपक्षीय जि.प. सदस्यांकडून सक्रिय व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)