दत्तात्रय आंबुलकर 
महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील बरसाली गावात घरांच्या पाट्यांवर मुलींचे नाव लिहिण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. सर्व गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे एकमताने स्वागत आणि अनुकरण केले आहे. उपक्रमांतर्गत ज्या दिवशी व निर्धारित वेळी बरसाली गावच्या सर्व घरांवर मुलींची नावाची पाटी लावली गेली तेव्हा या उपक्रमामागची प्रेरणा असणारे बैतूलचे आमदार हेमंत खंडेलवाल हे आवर्जून उपस्थित होते.
या उपक्रमाची सुरुवात सुमारे दोन वर्षांपूर्वी बरसाली गावच्या अनिल यादव या युवकाने केली. त्यानुसार अनिल यादव यांनी त्यांच्या मुलीला तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून व तिला कुटुंबातील एक उल्लेखनीय सदस्य असल्याची जाणीव व्हावी अशा दुहेरी उद्दिष्टांनी त्यांनी आपल्या घरावरील पाटीवर तिचे नाव पण लिहिले. त्यांच्या या पुढाकाराने गावातील इतरांना प्रेरणा मिळाली, गावात त्यावर उत्सुकतापूर्ण चर्चा सुरू झाली व त्याद्वारे इतरांनी पण अनिल यादव यांचे अनुकरण करीत आपापल्या घरांवर पण मुलींच्या पाट्या लावणे सुरू केले. या पाट्यांच्या माध्यमातून परिवर्तनाची वाटचाल इतरांनी पण स्वीकारली.
परिणामी आज बरसाली गावच्या प्रत्येक संबंधित घरावर मुलीची पाटी तिचे नावनिशाणीच नव्हे तर घर आणि कुटुंबाची इतरेजनांना ओळख व्हावी या उद्देशांनी लावली आहे. या पार्श्‍वभूमीवर या वेगळ्या ग्रामीण उपक्रमाचे प्रणेते अनिल यादव सांगतात की त्यांनी सुरुवात त्यांची मुलगी आयुषी हिच्या पहिल्या वाढदिवसापासून केली तेव्हा त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते ते घरचे यासंदर्भात काय भूमिका घेतील या प्रश्‍नचिन्हाचे. मात्र, सुदैवाने अनिलजींच्या आई-वडिलांनी केवळ समर्थनच दिले असे नव्हे तर त्यांचे जाहीर कौतुक केल्याने साऱ्या गावकऱ्यांमध्ये यानिमित्ताने सकारात्मक संदेश गेला.
बरसाली गावातील एक मुलगी माधुरी हिने या सगळ्याबद्दल आणि बदलत्या वातावरणाच्या संदर्भात असे मोठ्या आनंदाने व अभिमानाने सांगितले की, तिला आता या गोष्टीमुळे आनंद होतो की आता तिच्या घराची ओळख “माधुरीचे घर’ या तिच्या नावासह होते. तर आयुषीची आई सुनीता यांच्या मते त्यांना असा पूर्ण विश्‍वास आहे की या अभियानातून केवळ गावातच नव्हे तर समाजात पण नक्कीच चांगले काही घडेल- परिवर्तन येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)