प्रेयसीच्या घरावर टाकला डुक्‍करबॉम्ब

पुणे, दि. 10 – धायरी येथील डीएसके विश्व रोड परिसर राहणाऱ्या एका तरूणीने प्रेमभंग केल्याने तिला धडा शिकवण्यासाठी वडकी येथील दोघा तरूणांनी ती रहात असलेल्या परिसरात बॉम्बस्फोटाचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या तरूणांनी फटाक्‍यातील दारू माचीसारख्या बॉक्‍समध्ये भरून तसेच त्यामध्ये बॉल बेअरींग टाकून हा स्फोट घडवला होता. शिकार करणाऱ्या व्यक्ती ससे, हरीण, डुक्‍कर असे प्राणी मारण्यासाठी अशा बॉम्बचा वापर करतात. याला डुक्कर बॉम्ब असेही संबोधले जाते.
किशोर आत्माराम मोडक (30) व अक्षय राजाभाऊ सोमवंशी (24, रा. वडकी, सासवड रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, बुधवारी पहाटे 3 वाजता फटाक्‍यासारख्या आवाजाने धायरी डीएसके विश्व रोड परिसर हादरला होता. येथील सोसायटीतील एका घराच्या खिडकीची काच देखील फुटली होती. या घटनेनंतर धायरी परिसरात बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली होती. याची खबर सिंहगड पोलिसांना मिळाल्यावर ते तत्काळ घटनास्थळी पोहचले होते. घटनास्थळी पोलिसांना काही छर्रे देखील सापडले होते. यामुळे ही बाब गांभीर्याने घेत घटनास्थळाच्या आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन तरूण बॉम्ब सदृश्‍य वस्तू घराच्या खिडकीवर फेकून चार चाकी वाहनातून पळताना दिसले होते. हे दोघे ज्या चार चाकी गाडीतून आले, त्या गाडीचा शोध घेऊन दोघांना वडकी येथून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी हस्तगत केली आहे.
यातील आरोपी किशोर मोडक याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने माहिती दिली की, डीएसके रोड धायरी पुणे येथे त्याची मावशी राहत होती. यामुळे तो मावशीकडे नेहमी येत जात असल्यामुळे त्यांचेच शेजारी राहणाऱ्या एका तरूणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. दोन वर्षानंतर त्यांचा प्रेमभंग झाला. संबंधीत मुलीने त्यांच्याशी बोलणे तसेच भेटणेही टाळले. यामुळे तरूणीला धडा शिकविण्यासाठी त्याने हे कृत्य केले.
स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता यादव, महिला सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, फौजदार गिरीष सोनवणे, कर्मचारी रफीक नदाफ, टकले, दयानंद तेलंगे पाटील, मयुर शिंदे, श्रीकांत दगडे, सचिन माळवे, निलेश कुलथे, दत्ता सोनवणे, यशवंत ओंबासे, संतोष सावंत, राहुल शेडगे, निलेश जमदाडे, हरीष गायकवाड, उमेश फणसे यांनी अटक केली.

चौकट
मोडक याचे मोबाइल दुरूस्तीने दुकान आहे. तर त्याचा मावस भाऊ कुत्र्यांना मारण्यासाठी तसेच शिकारीसाठी अशा प्रकारचा बॉम्ब बनवत होता. त्याच्याकडूून थोडीफार माहिती घेऊन त्याने फटाक्‍याची दारू मोठ्या प्रमाणावर एकत्र करून काडी पेटीच्या आकाराच्या पुठ्ठ्यात भरली. यानंरत त्यात एम सीलमध्ये बॉल बेअरिंग टाकून त्याला वात लावली. वात पेटवल्यानंतर तरूणी रहात असलेल्या घराच्या परिसरात हा बॉम्ब टाकण्यात आला. याप्रकरणी घराच्या खिडकीची काच फुटल्यामुळे तेथील रहिवाशाने दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये भादवि 286 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)