प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला वाळीत टाकले

सोनई – नेवासा तालुक्‍यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजातील एका मुलीने प्रेमविवाह केला असता समाजाची कथित जातपंचायत चालवणाऱ्या पंचांनी तिला वाळीत टाकले. याच्या निषेधार्थ कथित पंचांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सोनई येथील डवरी गोसावी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर, सुदाम शिंदे, पिराजी शिंदे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर असे की, सोनई येथील डवरी गोसावी समाजातील एका मुलीचे घरच्यांनी लग्न ठरवले होते, पण तिचे समाजातीलच एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलीने घरातून पलायन केले. तिच्या प्रियकराने “तू जीव देऊ नकोस, तू सरळ माझ्या घरी रावळगाव (ता. मालेगाव) येथे ये’ म्हणून सांगितले. मुलगी रावळगाव (ता. मालेगाव) येथे सुखरूप पोहोचली असता प्रियकराच्या आईने मुलगी आपल्या घरी आली असल्याचे मुलीच्या घरी सांगितले.

दुसऱ्या दिवशी मुलीचे आई, वडील, आजोबा यांनी रावळगावच्या मुलाच्या घरी येऊन तिला मारहाण केली. तिचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण खाकुर्डी (ता. मालेगाव) पोलीस ठाण्यात गेले असता समझोता होऊन मुला-मुलींचा विवाह पोलिसांच्या मध्यस्थीने झाला. पुढे डवरी गोसावी समाजाची जातपंचायत बसली. यातील पंच भीवराव विठ्ठल शिंदे (पाटस), नाथा नारायण बाबर (सुरेशनगर), भाऊराव धर्मा शिंदे (मोहोळ), प्रकाश एकनाथ सावंत, बाबुराव तात्या चव्हाण (पाटस), साहेबा भिवाजी शिंदे यांनी प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला समाजातून वाळीत टाकले. समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर, सुदाम शिंदे, भाऊराव शिंदे, भाऊराव शेगर, शिवराम सावंत, नामदेव शेगर, बबन शिंदे, उत्तम शिंदे, भगवान शेगर, हरिश्‍चंद्र सावंत, दास चौघुले यांनी समाजातील रुढीपरंपरा, जातपंचायत याच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे समाजातील जातपंचायत नष्ट करावी, तसेच लोकशाहीने न्यायालय न्याय मागण्यासाठी केले असताना हे कथित पंच आधुनिक काळात जातपंचायत भरवत असून या कथित पंचांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)