प्रेक्षकांसाठी झकास विनोदी मेजवानी ‘माझ्या बायकोचा प्रियकर’

पती-पत्नीच्या नात्यातील गंमत काही औरच असते. हे नातं विश्वासावर टिकून असतं, पण यात जर तिसरी व्यक्ती आली तर काय होतं ते आपण यापूर्वी बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. असं असलं तरीही अद्याप या नात्यांतील काही पैलू अप्रकाशितच राहिले आहेत. याच नात्यांवर प्रकाश टाकणारा तसंच भाष्य करणारा या नात्याकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहणारा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा नवा चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

निर्माते दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जयंतीलाल गाडा यांनी राजकला मुव्हीज आणि बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. या बॅनरखाली ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ची निर्मिती केली आहे. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या दिग्दर्शक राजीव एस. रुईया यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. विनोदातील अचूक टायमिंग साधत रसिकांना मोहिनी घालणारा लेखक-अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या जोडीला या चित्रपटात अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात भाग्यश्री मोटेसोबत दोघांची जोडी जमली आहे. हा चित्रपट जरी पती-पत्नीच्या नात्यावर आधारित असला तरी वनलाईन खूप वेगळी आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री कशाप्रकारच्या गंमती जमती घडतात त्याचं विनोदी चित्रण म्हणजे ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा चित्रपट आहे.

प्रियदर्शन, अनिकेत आणि भाग्यश्रीच्या जोडीला या चित्रपटात अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे आणि मीरा जोशी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट खऱ्या अर्थाने एका वेगळ्या वनलाईनवर आधारित असून, रसिकांना पोट भरून हसवणारा आहे. हा चित्रपट म्हणजे लक्षवेधी कथानकाच्या जोडीला निखळ विनोदाची जणू मेजवानीच आहे. समधूर गीत-संगीत, नयनरम्य लोकेशन्स, मनमोहक छायालेखन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे ही विनोदी मेजवानी आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टिमने केला असल्याचं मत दिग्दर्शक राजीव रुईया यांनी व्यक्त केलं आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शन जाधव आणि अनिकेत जाधव ही जोडी पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोघांची विनोदी केमिस्ट्री अनुभवण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार असल्याच मत निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. अभिजीत गाडगीळ यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली असून संवादलेखन संदिप दंडवते यांनी केलं आहे. जावेद ए. शेख यांनी छायालेखन केलं आहे, तर रविंद्र राम पाटील यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे. सुरेश पिल्ले आणि अभय इनामदार यांनी लिहिलेल्या गीतांना विवेक कार, राजू सरदार आणि प्रभाकर नरवडे यांनी संगीत दिलं आहे. स्वाती शर्मा, नकाश अझीझ, सुशांत दिवगीकर, सुरेश पिल्लई यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)