प्री लॉन्च ऑफर फायद्याची, पण… (भाग-१)

गृहनिर्माण प्रकल्प तयार झाल्यानंतर त्यातील फ्लॅटच्या किमती वाढतात. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी “प्री-लॉंच बुकिंग ऑफर’ देऊन ग्राहकांना आकृष्ट करण्याचा शिरस्ता सध्या वाढत आहे. यामुळे प्रकल्पाच्या प्रारंभावेळी जी किंमत असेल, त्या किमतीत घर मिळू शकते. त्यामुळे ग्राहकाचा फायदा होत असला, तरी त्यात जोखीमसुद्धा असते.

ग्राहकांना आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांकडे आकर्षित करण्यासाठी विकसक नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. त्यातील काही ऑफर्स लाभदायक असतात, तर काही ऑफर्स स्वीकारण्यात काहीशी जोखीम असू शकते. अशीच एक ऑफर म्हणजे प्री-लॉंच बुकिंग होय. या ऑफरनुसार, विकसक प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वीच फ्लॅटचे बुकिंग सुरू करतो. असे करण्यामागे मुख्यत्वे प्रकल्पासाठी पैसा जमविण्याचाच हेतू असतो. त्यासाठी तो प्री-लॉंच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मोठा डिस्काउंटही देत असतो. परंतु अशी ऑफर स्वीकारण्यापूर्वी ग्राहकाला बरीच शहानिशा करावी लागते. कारण अनेकदा असे प्री-लॉंच बुकिंग संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बांधकाम परवाना मिळविण्यापूर्वीच सुरू केले जाते. प्री-लॉंच ऑफरमध्ये विकसक ग्राहकाकडून फ्लॅटच्या किमतीचा काही हिस्सा बुकिंग अकाउंटअंतर्गत घेतो. ही रक्कम विकसकाला भांडवल म्हणून उपयोगी पडते. परिणामी बॅंका आणि वित्तसंस्थांकडून विकसकाला फार मोठे कर्ज घ्यावे लागत नाही.

प्री लॉन्च ऑफर फायद्याची, पण… (भाग-२)

प्री-लॉंच ऑफरमधून ग्राहकाचा फायदा निश्‍चितच होतो. कारण प्री-लॉंच ऑफरच्या वेळी फ्लॅटच्या किमती कमी ठेवल्या जातात. एकदा प्रकल्प पूर्ण झाला की मग फ्लॅटच्या किमती वाढू लागतात. अनेकदा त्या इतक्‍या वाढतात की, प्री-लॉंच बुकिंग केले नसते, तर हे घर आपल्याला कधीच परवडू शकले नसते, अशी ग्राहकाची धारणा होते. म्हणजेच, प्री-लॉंच ऑफर स्वीकारण्यात फायदा नक्कीच आहे. परंतु या फायद्याबरोबरच जोखीमही पत्करावी लागते. कधी-कधी तर अशा प्रकरणांमध्ये फसवणूकही होऊ शकते. कारण, स्वस्तात घर मिळते आहे म्हणून ग्राहक अनेकदा अशा जोखमीकडे लक्षही देत नाहीत. त्यामुळे अनेक बाबी ग्राहकांपासून लपवून ठेवल्या जाण्याचीही शक्‍यता असते. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे प्री-लॉंच बुकिंग करण्याचा निर्णय घेतल्यास धोकाही असतो. तज्ज्ञांच्या मते, प्री-लॉंच बुकिंग ही चांगली संधी आहे. परंतु संबंधित विकसकाचे रेकॉर्ड चांगले असणे आवश्‍यक आहे. विकसक प्रतिष्ठित आणि विश्‍वासार्ह असल्यास ही ऑफर स्वीकारण्यात काहीच गैर नाही. अर्थात कोणत्याही परिस्थितीत प्री-लॉंच ऑफर स्वीकारताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

– कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)