प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये “पुणे7एसेस’ संघाची घोषणा

पुरुष दुहेरीमधील अव्वल खेळाडू मॅथिआस बो करणार पुणे संघाचे नेतृत्व

पुणे: प्रीमिअर बॅडमिंटन लीग या भारतातील आघाडीच्या क्रीडा महासंघातर्फे चौथ्या स्पर्धेसाठी पुणे7एसेस या संघाचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेमध्ये देशातील उत्कृष्ट संघ सहभागी होणार आहेत. पुणे7एसेस या संघाचे सह-मालकी हक्क अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याकडे आहेत. पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्‍स सिटी मॉल येथे या संघाचा प्रदर्शनीय खेळ झाला. यावेळी या संघाच्या खेळाडूंची ओळख पन्नू हिने सर्वांना करून दिली.

भारतीय बॅंडमिंटन क्षेत्रातील काही नामवंत खेळाडू “पुणे7एसेस’मध्ये सामील झाले आहेत. यामध्ये आघाडीचा खेळाडू अजय जयराम, या वर्षी झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक आणि पुरूष दुहेरीमध्ये रौप्यपदक मिळवलेला चिराग शेट्टी, कॅनडातील यंदाच्या जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवलेला लक्ष्य सेन, तसेच महिला बॅडमिंटन संघातील दिग्गज खेळाडू प्राजक्ता सावंत यांचा समावेश आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आनंद पवार हे असणार आहेत.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम हे पुणे7एसेस संघाचे मुख्यालय असणार आहे. हा संघ मुंबईत येत्या 22 डिसेंबर रोजी आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. संघाचे मालकी हक्क तापसी पन्नू हिच्याबरोबरच मुंबईतील केआरआय एन्टरटेन्मेंट या बुटीक सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीकडे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅंडमिंटनमध्ये नाव कमावलेल्या काही दिग्गज खेळाडूंना पुण्याच्या या संघाने लिलाव प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. पुरूष दुहेरी या प्रकारातील राजा म्हणून नावाजलेला मॅथिआस बो हा पुणे7एसेस संघाचे मुख्य नेतृत्व करणार आहे. तसेच स्पेनची कॅरोलिना मेरिन ही 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती महिला एकेरी गटाचे नेतृत्व करणार आहे. तिला डेन्मार्कची खेळाडू लीन केआर्सफेल्ट ही साथ देईल. पुण्याच्या या संघाला दुहेरी गटामध्ये गुणवंत खेळाडूंची चांगली उपस्थिती लाभली आहे.

मिश्र दुहेरी गटात चमकदार नैपुण्य दाखवणारा चिराग शेट्टी आणि अनुभवी व्लादिमिर इव्हानोव्ह यांचा खेळ या संघातर्फे पाहायला मिळेल, तर पुरूष एकेरी गटात लक्ष्य सेन हा आपली कामगिरी दाखविणार आहे.

या प्रसंगी तापसी पन्नू म्हणाली, “‘प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये पुणे7एसेस संघाच्या प्रचाराची सुरुवात करताना मी अतिशय उत्साहीत झाले आहे. आमच्या संघामध्ये नवीन व अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. “प्रीमिअर बॅडमिंटन लीग’मध्ये आपल्या संघाला अव्वल क्रमांकाचा बनविण्यासाठी आमचे खेळाडू सांघिक व वैयक्तिक नैपुण्य दाखवतील, याची मला खात्री आहे. आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच आलो आहोत आणि ही भावना आमच्या खेळाडूंमध्ये आहे, हे मला दिसून येत आहे. पुणे ही बॅडमिंटनसाठी उत्कृष्ट बाजारपेठ आहे आणि येथे या खेळाला पुढील स्तरावर नेण्यासाठी जे आवश्‍यक आहे, ते मी निश्‍चितच करेन. आमच्या खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी मी प्रत्येक सामन्यात उपस्थित असणार आहे.”

“प्रीमिअर बॅडमिंटन लीग’च्या मागील स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावरील 60 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांत नऊजण ऑलिंपिक पदकविजेते होते. तसेच भारतातील गुणवंत खेळाडूही सामील होते. पुणे7एसेस संघाच्या समावेशामुळे या लीगमध्ये आता आणखी काही दिग्गजांची भर पडली आहे.

संपूर्ण संघ
पुरुष एकेरी : लक्ष्य सेन, अजय जयराम, ब्राईस लिव्हर्डझ. महिला एकेरी : कॅरोलिना मेरिन, लीन केआर्सफेल्ट. पुरुष दुहेरी : मॅथिआस बो, व्लादिमिर इव्हानोव्ह, चिराग शेट्टी. मिश्र दुहेरी : प्राजक्ता सावंत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)