प्रीतिसंगम उद्यानात अस्ताव्यस्त पार्किंगवर कारवाई

बेशिस्त वाहन चालकांना चाप लागल्याने नागरिकांत समाधान

कराड, दि. 12 (प्रतिनिधी) – कराडच्या प्रीतिसंगम उद्यान परिसरात बेशिस्त पार्किंग आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच घोडेसवारीचे फॅड यामुळे प्रीतीसंगम उद्यानातील प्रवेशद्वाराला अवकळा आल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. याची दखल नगरपालिका व वाहतूक शाखेकडून घेतली असून घोडे मालक व बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वाहन चालकांना चाप लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कराडचे प्रीतिसंगम उद्यान पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण बनले आहे. उद्यानामुळे कराडच्या ओळखीमध्ये आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्या, रविवार आणि सकाळी-संध्याकाळी विरंगुळा व मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी उद्यान गजबजून जाते. मात्र, उद्यान परिसरात बेशिस्त पार्किंग आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच घोडेसवारीचे फॅड यामुळे प्रीतीसंगम उद्यानातील प्रवेशद्वाराला अवकळा आली होती. उद्यान परिसर संध्याकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत गजबजलेला असतो. प्रवेशद्वाराबाहेर असलेले अनेक खाद्य पदार्थांचे गाडे, घोडेसवारी, लहान मुलांसाठी असलेल्या रिमोट कंट्रोलवरील गाड्या, बेदरकार व धूम स्टाईलने दुचाकी चालवणारे युवक यांच्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. याबाबतचे प्रीतिसंगम उद्यानात पार्किंगचा बोजवारा, प्रवेशद्वारावरच अवकळा या बातमीव्दारे सडेतोड वार्तांकन करण्यात आले होते. याची पालिकेकडून व कराड शहर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर उद्यान प्रवेशद्वारावर आणि उद्यान परिसरात चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे चारचाकी वाहने कृष्णा नदीपात्रापर्यंत नेली जातात. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात चारचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे वाहनधारकांना गर्दीतून मार्ग शोधावा लागतो. अशावेळी एखादा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी पालिका प्रशासनाने चारचाकी वाहनांसाठी पे ऍन्ड पार्क सुविधेद्वारे नागरिकांना सुरक्षित पार्किंग व्यवस्था देण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)