प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन तरुणीची स्वतःच्याच घरी चोरी

औरंगाबाद : प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमवीरांना आपण काय करतो हे कधी-कधी लक्षात येत नाही. परंतु, ज्यावेळी लक्षात येते त्यावेळी त्यांच्या हातून वेळ निघून गेलेली असते. औरंगाबादमधील एका अल्पवयीन मुलीनेदेखील आपल्या प्रियकरासाठी केलेला गुन्हा तिला चांगलाच महागात पडला आहे. प्रियकराच्या सांगण्यावरुन घरातील दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तरुणीला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अक्षय वाहूळ नावाच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन तिला आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारायला सांगितलं. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीने देखील आईचा विचार न करता घरातील दागिने आणि रक्कम चोरली. मुलीची आई भाजी विकून आपल्या एकुलत्या एक मुलीसह उदरनिर्वाह करतात. 17 मार्चला त्यांच्या घरी चोरी झाली. मुलीच्या लग्नासाठी एक-एक रुपया जमा करुन विकत घेतलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात येताच आई हतबल झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा घराचं कुलूप उघडताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय ज्या पोटीत सोनं ठेवले होतं, त्याची तेलाच्या किटलीत ठेवलेली चावी चोरट्यांना सहज सापडल्याने पोलिसांची शंका बळावली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रियकराच्या मदतीने आपण दागिने लांबवल्याची कबुली तरुणीने दिली. आरोपी प्रियकराने यापूर्वीही चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलीने चोरी केली आहे, तर तिला शिक्षा व्हायलाच हवी, असा पवित्रा आईने ठेवत घेतला आणि मुलीविरोधात तक्रार नोंदवली. या चोरीप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, तर तिचा प्रियकर सध्या तुरुंगाची हवा खात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)