“प्रिंट’ स्वरुपात दिसणार तुमचे मत

संग्रहित छायाचित्र....

निवडणूक आयोग इव्हीएमसोबत पुरविणार “व्हीव्हीपीएटी’ मशीन

पुणे – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन)सोबत “व्हीव्हीपीएटी’ (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. त्यानुसार इव्हीएमच्या बाजूलाच “व्हीव्हीपीएटी’ जोडले जाणार आहे. इव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूल्या “व्हीव्हीपीएटी’ मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेंकद दिसणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपण नोंदवलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाल्याची खात्री पटणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ईव्हीएम्‌ वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, ईव्हीएम सोबत “व्हीव्हीपीएटी’ जोडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नवीन इव्हीएम बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि “व्हीव्हीपीएटी’ मशीन दिले आहे. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर आता इव्हीएमसोबत “व्हीव्हीपीएटी’ मशीन असणार आहे.

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये इव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. मशीनमध्ये सेटिंग केलेली आहे. “त्यामुळे हा उमेदवार विजयी झाला’, “कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते’, असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. तर काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर मतदाराने कोणाला मतदान केले, याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपीएटी या मशीनवर दिलेले मत प्रिंट स्वरुपात दिसण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केलेली आहे. यामुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात हा प्रयोग राबविण्यात आला आहे.

“प्रिंट’ सोबत नेता येणार नाही
ज्या उमेदवाराच्या समोरचे चिन्ह दाबले असेल ते चिन्ह आणि उमेदवाराचा अनुक्रमांक हे प्रिंट स्वरुपात व्हीव्हीपीएटी मशीनवर दिसणार आहे. त्यानंतर ही स्लीप “कट’ होऊन या मशीनच्या बॉक्‍स मध्ये पडणार आहे. ही स्लीप उमेदवाराला घरी घेऊन जाता येणार नाही. जर इव्हीएम काही कारणामुळे बंद झाले, तर अशावेळी हे प्रिंट स्वरुपात स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यासाठी मिळणारी यंत्रणा

16, 690
बॅलेट युनिट


9, 762
कंट्रोल युनिट


9, 762
व्हीव्हीपीएटी मशीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)