प्रा. सुनील नेरलकर यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

नांदेड -कॉंग्रेसचे “थिंक टॅंक’ चे सदस्य म्हणून ओळख असलेल्या प्रा. सुनील नेरलकर यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पत्र प्रदेश कार्यालय सचिव मुकूंद कुळकर्णी यांना दिले आहे. प्रा.नेरलकर यांच्या माध्यमातून या पदावर नांदेडच्या व्यक्तीला प्रथमच काम करण्याची संधी मिळाली आहे.

1985 ते 1992 व 1992 ते 1997 या काळात प्रा.सुनील नेरलकर नांदेड नगरपालिकेचे तर 1997 ते 2002 या काळात महानगरपालिकेचे सदस्य होते. या तीनही निवडणूका त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लढविल्या. याच काळात त्यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यानंतर 2002 ते 2007 या काळात ते पुन्हा मनपात निवडूण गेले. नांदेडचे तत्कालीन शिवसेना आमदार कै. प्रकाश खेडकर यांच्यामुळे त्यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढविली. एकुण 4 टर्म प्रा. नेरलकर मनपाचे सदस्य राहीले आहेत. 2007 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. परंतू तेथे राजकारणात ते फारसे सक्रिय नव्हते. या काळात त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही.

2008 व 2012 च्या मनपा निवडणूकीचा कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचा मसुदा त्यांनीच तयार केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्यामुळे नांदेडला या पदावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाली आहे. संघ परिवार आणि भाजपच्या जुन्या पिढीतील नेत्यांनी त्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्‍यामसुंदर शिंदे यांनी प्रा. नेरलकर यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या होमटाऊन मध्ये प्रा. नेरलकर यांच्या सारखा महत्त्वाचा कार्यकर्ता कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)