प्रा. मोरे उद्यानातील हिरवळ करपली

भोसरी – उन्हाळा सुरू झाला नाही तोच महापालिकेच्या इंद्रायणीनगर मधील प्रा. रामकृष्ण मोरे उद्यानातील हिरवळ सुकून गेली आहे. उद्यानातील झाडांसाठी पूर्वी एक इंचाचे नळजोड होते. मात्र, पाणी पुरवठा विभागाने उद्यान विभागाला विश्‍वासात न घेता परस्पर अर्धा इंचाचा नळजोड दिला. त्यानंतर ही परिस्थिती उद्‌भवल्याचा आरोप होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक 2 मध्ये प्रा. रामकृष्ण मोरे उद्यान आहे. 58 हजार 125 चौरस फूट जागेत हे उद्यान आहे. त्यात विविध प्रकारची झाडे, लहान मुलांसाठी खेळणी, पाथवे, बौद्ध समाज बांधवांसाठी ध्यान वर्ग आहे. परिसरातील नागरिक सायंकाळी तसेच सुट्टीच्या दिवशी विरंगुळ्यासाठी याठिकाणी येतात. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्यांची गर्दी असते. विद्यार्थी अभ्यासासाठी येथे येतात.

महापालिकेकडून या परिसरात चोविस तास पाणी पुरवठ्याचे काम सुरू आहे. हे काम करताना पाणी पुरवठा विभागाने विश्‍वासात न घेता परस्पर एक इंचाचे कनेक्‍शन बंद करुन अर्धा इंचाचे कनेक्‍शन दिले. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत उद्यानाला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे लॉन करपून गेले आहे. शोभेची झाडे देखील सुकू लागली आहेत. त्यामुळे उद्यानात रखरख जाणवत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच उद्यानाची ही अवस्था झाली आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्यात याहून अधिक परिस्थिती होण्याची भीती येथील कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. लॉनची देखभाल करण्यासाठी जास्तीचे पाणी आवश्‍यक आहे. लॉन सुकून गेल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हिरवळीचा आनंद घेता येत नाही. मुलांना खेळताना जखमा होतात. येथील बुद्ध विहारामध्ये बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने येत असतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अवघ्या महिनाभरावर आली आहे. त्यामुळे उद्यानाच्या देखभालीची गरज आहे. पाथवे आणि पदपथांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
– गिरीश वाघमारे, उपाध्यक्ष, प्रा. रामकृष्ण मोरे उद्यान, बुद्ध विहार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)