#प्रासंगिक: संस्कृत भाषेचे नव्याने पुनरुज्जीवन होणे गरजेचे 

माधव विद्वांस 
संस्कृत या शब्दांतच सुसंस्कार आहे. संस्कृत अध्ययनामुळे, पाठांतरामुळे स्मरणशक्‍ती तीव्र होते. नुसताच संस्कृत दिवस साजरा करून किंवा शाळेत सक्‍तीने शिकवून ही भाषा टिकणार नाही, त्यासाठी घराघरातून मुलांकडून संस्कृत श्‍लोकांचे पठण करून घेतले, तर मुलांनाही त्याची गोडी लागेल. 
सम्यक्‌ कृतम्‌ इति संस्कृतम्‌!
भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती ।
तस्यां हि काव्यं मधुरं, तस्मादपि सुसुभाषितम्‌ ।।
संस्कृत भाषा ही आर्य भाषा आहे. आर्य सर्वच बाबतीत पुढारलेले होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत उपयुक्‍तता, योग्यता, परिपूर्णतः होती. मग त्याला भाषा अपवाद कशी असेल? म्हणूनच संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे, ती कर्णमधुर आहे, सृजनशील, नादमाधुर्य, प्रतिभा पण आहे. त्यातील सुभाषिते व काव्य गोड आहेतच.
संस्कृतचे अनोखे फारसे माहीत नसलेले रूप म्हणजेच विलोमपद (पॅलिन्ड्रोमिक झरश्रळपवीोळल). म्हणजे काव्याचा उजवीकडून डावीकडे वाचले तर एक अर्थ पण डावीकडून उजवीकडे वाचले तर दुसरा अर्थ दाखविला जातो, अशा प्रकारचे काव्य फक्‍त संस्कृत मधेच दिसून येते. सन 1400 मध्ये होऊन गेलेल्या यज्ञ सूर्य या पंडिताने आशय प्रकारच्या रचना केल्या आहेत त्याचा खालील एक श्‍लोक पाहा. उजवीकडून डावीकडे वाचले तर रामायण व डावीकडून उजवीकडे वाचले तर महाभारत उदाहरणार्थ पहा…
तं भूसुतामुक्तिमुदारहासं
वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ।
श्रीयादवं भव्यभतोयदेवं
संहारदामुक्तिमुतासुभूतम्‌।
संस्कृतच्या सौंदर्याची अशी अनेक उदाहरणे देता येतील. पूर्वी संस्कृत ही भाषा समाजाच्या सर्वच स्तरांत बोलली जायची. जेथे जेथे आर्य स्थलांतरित झाले, तेथील प्रचलित भाषा आणि संस्कृत यात कमालीचे साम्य आढळ्ते. आर्य लोक उत्तर ध्रुवावरून स्थलांतरित झाले. काही तैग्रिस नदीचा काठावर स्थिरावले, काही यांग त्से तर काही नाईल नदीच्या काठावर, काही जण व्होल्गा आणि काही जण यमुना व गंगेच्या ठिकाणी स्थिरावले. आता पाहा ना पुण्याची वस्त्रगाळ मराठी, सातारा कोल्हापूरची रांगडी, वैदर्भीय नागपुरी हा फरक आहेच. तसाच कालपरत्वे दूर देशात भाषेत बदल होत गेला. वातावरणानुसार राहणीमानात बदलत होत गेले. इंग्रजी-जर्मनी या भाषाही संस्कृतशी मिळत्या जुळत्या आहेत.
अगदी कायम वापरात असलेले काही शब्द पहा जसे पितर-फादर, मातर-मदर, भ्रातर-ब्रदर, विधवा-विडव्‌, स्वेद-स्वेट, माध्यम-मिडीयम, पथ पाथ, नाम-नेम असे अनेक शब्द आहेत की यांची नाळ एकच दिसून येते. अगदी आकडेसुद्धा पहा त्रि-ींहीशश; चार-र्षीीे; अष्ट-शळसहीं; षष्ठ-डळुींह.
पूर्वी व्यास, विदुर, श्रीकृष्ण, विश्‍वामित्र हे क्षत्रिय उत्तम संस्कृत जाणायचे अगदी श्रीराम आणि रावण हे पण संस्कृत जाणायचे. वाल्मिकी वनवासी असून संस्कृत जाणायचे. म्हणजे सर्व थरात संस्कृत बोलले जायचे. अगदी ह्युआन त्सेंग हा देखील भारतात येण्यापूर्वी चीनमधील चंगेन येथे संस्कृत शिकण्यासाठी गेला होता. म्हणजे चीनमध्येही संस्कृत शिकवले जायचे. जर्मन कवी योहान वोल्फगांग गॉय्थं (गटे) हा तर कालिदास-विरचित “शाकुंतल’ वेडा होता. आयुर्वेदाचा भारतात जेवढा अभ्यास अलीकडील काळात झाला नसेल तेवढा जर्मन लोकांनी केला. ज्या ग्रंथावरून शिवचरित्र सर्वमान्य झाले, त्या “परमानंदकृत शिवभारत’ या मूळ संस्कृत दुर्मीळ ग्रंथाची मूळ प्रत भारतात कोठे आहे, हे जर्मन ओरिएन्टल सोसायटी या पौर्वात्य ग्रंथसूची ठेवणाऱ्या संस्थेने, शिवभारताचे मूळ संकलक/लेखक सदाशिव महादेव दिवेकर यांना दिली. त्यावरून जर्मन लोकांची संस्कृत अभिरूची किती उच्च दर्जाची होती, हे दिसून येते.
रामायण, महाभारत, चाणक्‍याचे अर्थशास्त्र, चाणक्‍यनीती, विदुरनीती हे सर्व संस्कृतमध्ये होते.होनाजी बाळा हे शाहीर गवळी होते. पण त्यांची भूपाळी ऐकली तर त्यावर असलेला संस्कृतचा प्रभाव जाणवतोच. छत्रपती संभाजी महाराज यांनी “बुधभूषण’ हा ग्रंथही संस्कृतमध्ये लिहिला होता. पेशवाईतील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे वाराणसीला जाऊन राहिले होते. तेथे त्यांनी तर्कशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना त्याचा न्यायदानातही उपयोग झाला. संत तुकारामांनी पांडुरंगाचा महिमा वर्णन करताना…
मकर कुंडले तळपती श्रवणी!
कंठी कौस्तुभमणी विराजित !
असे लिहिले आहे. याचे मूळ रूपही संस्कृत मधेच दिसून येते. दासबोध, गाथा, ज्ञानेश्‍वरी, विवेकसिंधु, संत नामदेवांच्या रचना याचे मूळ संस्कृत शब्दांतच सापडते. श्रीमद्‌भगवद्‌गीता तर श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृतमधूनच सांगितली.
आता मुद्दा आला संस्कृत जपण्याचा! दिवसेंदिवस वाढत जाणारे इंग्रजी शिक्षणाचे वेड संस्कृतच काय मराठी व इतर भारतीय भाषा धोक्‍यात आल्या आहेत, असे वाटते. मराठी भाषा संस्कृतमुळेच समृद्ध झाली. किमान 50 वर्षांपूर्वीची लेखक, कवी मंडळी संस्कृतशी थोडीतरी संबंधित असायची. त्यामुळे त्यावेळचे लेख व काव्य दर्जेदार अर्थपूर्ण असायचे. पूर्वी सायंकाळी घरातून शुभंकरोति, रामरक्षा व काही स्तोत्रे म्हणवून घेतली जात असत. त्यामुळे थोडे तरी संस्कृत शब्द मुलांच्या कानावर पडत असत. रामरक्षेतील पठणाने आपल्या हृदयात राम ओठावर आणा; बघा मुलांची वाणी किती शुद्ध होते.
संस्कृत उच्चाराने शब्द स्पष्ट होतात, वाणी प्रभावी होते. काही वक्‍त्यांची उदाहरणे पहा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते. त्यांचे मराठीतील “स्वतंत्रतेचे स्तोत्र’ संस्कृतची जोड असल्यानेच प्रभावी झाले. शिवाजीराव भोसले संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यामुळे त्यांची भाषाशैली प्रभावी झाली. शांता शेळके यांनी सांगितले आहे, “माझ्या संस्कृतच्या अभ्यासामुळे माझी काव्यप्रतिभा समृद्ध झाली.’ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव संस्कृतमध्ये कायम पहिले असायचे. प्रकांड पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कोठलीही इंग्रजी महाविद्यालयीन पदवी घेतली नव्हती. पण ते इंग्रजीतूनही चांगली व्याख्याने देत असत.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हेसुद्धा संस्कृतमध्ये बोलायचे. रामजन्म भूमीच्या चिघळलेल्या परिस्थितीत, त्यांना भेटायला आलेल्या साधूंबरोबर त्यांनी संस्कृतमध्ये संवाद साधला होता. जगात स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी आवश्‍यक आहे पण इंग्रजी येण्यासाठी संस्कृतची जोड असेल, तर आणखी सोपे नक्कीच होईल! चला संकल्प करू संस्कृतबरोबरच तिची आपली मराठीसारखी रूपे वाचवण्याचा!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)