प्रासंगिक: रा. ना. चव्हाण : समाज प्रबोधनाचा व्रतस्थ वाटसरू 

डॉ. आ. ह. साळुंखे 

महाराष्ट्रातील समाज-प्रबोधन चळवळीचे एक अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत दलित-मित्र कै. रा. ना. चव्हाण यांचा आज 29 ऑक्‍टोबर हा 105 वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त पुण्यात आजच “रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान’ वाईतर्फे रमेश चव्हाण यांनी संपादित केलेल्या “रा. ना. चव्हाण’ यांचा 37 वा लेखसंग्रह “हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन ः एक प्रबोधनात्मक मंथन’ प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त रा. ना. चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 

रा. ना. चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करणे उचित ठरेल. त्यांच्याविषयीच्या आठवणींचा एक भाग व्यक्‍तिगत संबंधाचा आहे. माझी वैचारिक जडणघडण होण्याच्या काळात माझे कौतुक करून मला प्रोत्साहन देणारे या नात्याने माझ्या वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून माझ्या मनात त्यांचे स्थान अतिशय आदराचे आहे. दुसरा भाग हा आपल्या समग्र समाजाचे विधायक दिशेने प्रबोधनाबाबतीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक समतोल तत्त्वचिंतक म्हणून ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. वाईत त्यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केली आणि ब्राह्मो समाजाच्या कामास वाहून घेतले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यांनी समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या संदर्भातील अभ्यासाला वाहून घेतले. तरुणपणापासून त्यांना लिहिण्याची आवड होती, ती त्यांनी अखेरपर्यंत जपली. शे-दीडशे वर्षांच्या सामाजिक इतिहासाचा प्रचंड तपशील रा. ना. चव्हाण यांच्या मस्तकात एखाद्या संगणकाप्रमाणे नोंदवून ठेवण्यात आला होता. हा सारा तपशील वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या प्रासंगिक लेखांच्या माध्यमातून समाजासमोर सातत्याने येत राहिला. या लेखनाला अभ्यास आणि संशोधनाची बैठक होती. त्यात अभिनिवेश नसे. ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज यांचा अवघा इतिहास त्यांच्या जिभेवरही असे आणि अखंडपणे लेखणीतूनही उतरत असे. या समाजाच्या स्थापना, त्यांच्या भूमिका, त्यांची उद्दिष्टे, कार्यपद्धती, त्यांच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कार्याचे स्वरूप इत्यादी विषयांच्या अनंत आठवणी त्यांच्या मस्तकामध्ये साठवलेल्या असत.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे इत्यादी व्यक्तींचे चरित्र आणि कार्य यांच्यावर त्यांनी विविध अंगांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांचे हे सर्व लेखन आपल्या समाजातील किमान 200 वर्षांचा इतिहास अतिशय सूक्ष्मपणाने आपल्यापुढे ठेवणारे आहे. त्यांचे एकूण वैचारिक कार्य पाहिले तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या परंपरेला साजेसे असे ते होते, हे लक्षात येते.

माझी आणि त्यांची पहिली भेट झाली, त्याला आता 40 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे; परंतु धोतर, कोट आणि विशिष्ट प्रकारची टोपी या वेशातील त्यांची साधी, प्रसन्न, समोरच्या व्यक्तीवर आपल्या सहवासात कोणतेही दडपण न आणणारी मूर्ती आजही आठवते. वाईमध्ये मी अनेकदा त्यांच्या घरी गेलो होतो. सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासातील असंख्य बारकाव्यांचे त्यांना असलेले स्मरण थक्‍क करून टाकणारे होते. परंतु, यांच्यामुळे त्यांच्या वर्तनात अणुभरदेखील आढ्यता
आढळत नसे.

विद्वत्ता सहजपणे धारण करण्याचा त्यांचा हा स्वभाव ही विद्वत्तेच्या क्षेत्रातील एक अतिश दुर्मिळ आणि अपवादात्मक बाब होती. या स्वभावामुळेच ते सदैव प्रसिद्धीपराङ्‌मुख राहिले. मग त्यांच्या ठिकाणी प्रसिद्धीचा हव्यास आढळणे, ही बाब तर दूरची होती. माझे हे शब्द कोणत्याही प्रकारे औपचारिकतेचे वा कृत्रिम अतिशयोक्तीचे नाहीत. कारण त्यांची ही नि:स्पृह वृत्ती मला अगदी जवळून पाहता आली आहे; किंबहुना हा माझा अनुभव आहे. तो मला खूप काही शिकवून गेला आहे. ते जेव्हा साताऱ्यात येत तेव्हा माझ्या महाविद्यालयात अथवा माझ्या घरी आवर्जून येत असत. मी वयाने त्यांच्यापेक्षा सुमारे 30 वर्षांनी लहान असूनही वयाचा भेद न मानता, प्रतिष्ठेच्या कल्पना मनात येऊ न देता माझ्याकडे येऊन मला भेटत, माझी चौकशी करत आणि प्रोत्साहन देत असत.

एखाद्या क्षेत्रात विशिष्ट भूमिका घेऊन धडपडत उभा राहू पाहणाऱ्या कोणाही तरुणाच्या दृष्टीने एका ज्येष्ठांकडून मिळणारे हे प्रोत्साहन किती बळ देणारे असेल, ते सहज समजू शकते. जेव्हा भेट होत नसे, तेव्हा त्यांचे पोस्टकार्ड येत असे. अतिशय बारीक, रेखीव, सुवाच्च अक्षरांत भरपूर मजकूर असलेले त्यांचे हे पत्र मला खूप समृद्ध करून जात असे. त्यांच्या सर्वच लेखनाचे वर्गीकरण, विश्‍लेषण आणि मूल्यमापन करणे, ही आता नव्या पिढीची जबाबदारी आहे. त्यांनी घालून दिलेल्या अभ्यास-संशोधन व प्रबोधन या मार्गाने गेल्यास तरुणांना निश्‍चितच काही एक दिशा मिळेल. रा. ना. चव्हाण यांच्या कार्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेत आपल्या समाजाला नवनिर्मिती करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल, असा मला
विश्‍वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)