प्रासंगिक: भाषिक न्यूनगंड नको

माधुरी तळवलकर

मराठीतले प्रतिभावंत कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन. “मराठी भाषा दिन’ म्हणून आपण तो साजरा करतो. कुसुमाग्रजांनी पूर्वी एके ठिकाणी म्हटलं आहे, “मातृभाषेचा दुराभिमान माझ्या ठिकाणी नाही, पण अभिमान मात्र अवश्‍य आहे. इंग्रजांची सत्ता गेली, पण इंग्रजी भाषेची सत्ता वाढत्या प्रमाणात येथे फैलावत आहे. इंग्रजी येत नाही म्हणून प्रगतीचे अनेक दरवाजे एखाद्याला बंद व्हावेत ही परिस्थिती खरोखर लज्जास्पद आहे. “लोकांना न कळणाऱ्या भाषेत चालणारी लोकशाही’ ही सुसंस्कृत जगात कोठेही नसलेली अद्‌भुत घटना आपण सिद्ध करीत आहोत. हा केवळ भाषेचा प्रश्‍न नसून समाजाच्या अस्मितेचा आणि म्हणून अस्तित्वाचा प्रश्‍न आहे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे जसं मराठी माणसाच्या रक्‍तात आहे, तसंच आतिथ्यशीलता हाही मराठी माणसाचा गुण आहे. केवळ पाहुण्यांचेच आदरातिथ्य आपण केलं नाही, तर आसरा शोधत असलेल्यांना ओसरी दिली. महाराष्ट्रात बाहेरून सातत्यानं लोंढे येत असतात. महाराष्ट्राच्या लहानमोठ्या गावातही भरपूर परप्रांतीय दिसतात. ते का? कारण मराठी माणूस त्यांच्या येण्याचा प्रतिकार करीत नाही. त्यांना त्रासदायक वागणूक देत नाही. उलट त्यांना हळूहळू आपल्यात सामावून घेतो.

शिवाजी महाराजांनी मराठी माणसाच्या सुप्तगुणांना स्वराज्याच्या धगधगत्या भावनेनं चेतवलं आणि मराठी साम्राज्याची स्थापना केली. संपूर्ण भारतवर्षानं कायम ऋणी राहावं अशी खरं तर ही कामगिरी आहे. त्यानंतर स्वातंत्र्ययुद्धातही मराठी माणूस अग्रणी होता. महाराष्ट्र हे मुंबईसह स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी आपण लढा दिला. समाजसुधारणा, राजकारण, साहित्य, रंगभूमी, संगीत सर्वत्र मराठी माणूस पुढे आहे. तरीदेखील स्वभाषा, मातृभाषा याविषयी आपल्या मनात एवढा न्यूनगंड का?

आपली भाषा बोलण्या-लिहिण्याबाबत आपण इतके निष्काळजी का? मराठी ही केवळ “अशिक्षित लोकांची बोलीभाषा’ असं आपण समजू लागलो आहोत का? चांगल्या करिअरसाठी मराठी भाषेकडे दुर्लक्ष करण्याइतके आपण खरोखरच अगतिक झालो आहोत का?

फाडफाड इंग्रजी बोलणं आपल्याला प्रतिष्ठेचं वाटू लागलंय. पण तुम्हाला हे माहितेय? फक्‍त 400 वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा ही कुचकामी आणि गावंढळ समजली जात होती. या भाषेत बायबलचं भाषांतर करण्यास म्हणूनच परवानगी नव्हती. त्याउलट त्याच्याही आधीपासून मराठीत ज्ञानेश्‍वरीसारखे बरेच उत्तमोत्तम साहित्यिक व तत्त्वज्ञानपर ग्रंथ रचले गेले होते.
“भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे!’ असं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. आज दहा कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे आणि मराठी भाषकांची संख्या जगात पंधराव्या क्रमांकावर आहे. मुळातच सशक्‍त असलेली मराठी भाषा आणि संस्कृती अशी सहजासहजी लोप पावणार नाही. मात्र तिची ही शान टिकून राहण्यासाठी मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड सोडून स्वराज्यात शक्‍यतो सर्व ठिकाणी कटाक्षानं मायबोलीत बोलणं, लिहिणं केलं पाहिजे.

इतरांच्या कानांवर आपली भाषा पडलीच नाही तर ते तरी इथली भाषा शिकणार कशी? इतर राज्यांत परप्रांतीय लोक स्थानिक भाषा झटपट शिकतात, नाहीतर त्यांचं रोजचं जगणंही कठीण होतं. आपण उलटं करतो. त्यांना दाखवून देतो की, स्वतःच्या राज्यातसुद्धा आम्ही तुमचीच भाषा बोलू.

मराठी ही आपल्याला मातेसमान आहे. आपल्या घरात आपल्या आईचा मान आपण स्वतः राखला तरच घरात येणारे पाहुणेही तिला मान देतील. तेव्हा मराठी दिनाच्या निमित्तानं, कवी कुसुमाग्रज यांना स्मरून आज आपण आपल्या राज्यभाषेचा मान राखण्याचा निश्‍चय करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)