प्रासंगिक : प्रेमानंद गज्वी : समर्थ लेखणीचा गौरव   

योगेश सोमण 

आगामी वर्षात व्हावयाच्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड नाट्य परिषदेने जाहीर केली आहे. हे सन्मानाचे पद मिळवताना, आजवर गज्वींनी ज्या माणुसकीच्या विचारांची पाठराखण केली आणि आपले जीवन रंगभूमीसाठी वाहिले, त्यांच्या लेखनाविषयी आणि एकूणच मनोभूमिकेविषयी ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केलेले विचार… 

कोणाही लेखकाची लेखनाविषयीची भूमिका जाणून घ्यायची असेल, तर त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता, त्याच्या लेखनाचा धांडोळा घेतला जावा, असं मला वाटतं. लेखकाचे संपूर्ण व्यक्‍तिमत्त्व त्याच्या लिखाणातून ओळखलं जावं, यावर माझा विश्‍वास आहे. प्रेमानंद गज्वी मला भावले ते त्यांच्या संयमी, साक्षेपी आणि कसदार लेखनामुळे.

गज्वी यांचा माझा पहिला संबंध आला होता, तो वर्ष 1990 मध्ये. त्यावर्षी मी फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना “पुरुषोत्तम करंडकासाठी’ मी गज्वींचे “गहान’ (गहाण) हे नाटक बसवले होते. एका खेड्यातल्या शेतमजुराला त्याने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपायी त्याचे संपूर्ण कुटुंबच सावकाराकडे गहाण कसे ठेवावे लागते, या सामाजिक संघर्षाच्या समस्येवर हे नाटक बेतले होते. या संपूर्ण नाटकात गज्वींनी उभारलेले प्रसंग, वापरलेले शब्द आणि त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम, हे सारंच विलक्षण असं होतं. त्यानंतर काही वर्षांनी “गहान’ नाटकाचंच मोठं स्वरूप “तन माजोरी’ या नावानं रंगमंचावर आलं. या दोन्ही नाटकांच्या यशाचं संपूर्ण श्रेय हे नाटककार म्हणून गज्वी यांच्याकडंच जातं.

मला लेखक भावतो तो त्याच्या लिखाणातूनच. याचाच आणखी एक प्रत्यय गज्वींनी दिला तो त्यांच्या “किरवंत’ या अत्यंत वेगळ्या नाटकातून. ब्राह्मण जातीतला अस्पृश्‍य समजल्या जाणाऱ्या, मर्तिकाची कामं-धार्मिक विधी करणाऱ्या “किरवंत’ समाजाची वेदना आणि उपेक्षा गज्वींनी समर्थपणे मांडली. पुण्या-मुंबईसारख्या शहरांपेक्षा लहान शहरे आणि ग्रामीण भागात किरवंतांची समस्या किती मोठी आणि जीवघेणी आहे, बहिष्कृतपणाची आहे, हे गज्वींनीच सर्वप्रथम दाखवून दिलं. किरवंतांचं सामाजिक झिडकारलेपण गज्वींनी समर्थपणे रेखाटलं. त्यामुळेच “आहे-रे’ वर्गापेक्षा “नाही-रे’ वर्गावर ठोस विचारांनी ठामपणे लेखन करणारा लेखक म्हणूनच गज्वी कायम ओळखले गेले. मी ज्यावेळी गज्वींना प्रथम भेटलो, त्यावेळी मला ते नाटककार, रंगकर्मी यापेक्षा चळवळीतले कार्यकर्ते-ऍक्‍टिविस्टच वाटले. एका विशिष्ट व्यवस्थेतून येताना

स्वतःची मतं मांडताना सामर्थ्यशाली लेखनकौशल्य असलेले अनेक जण विविध प्रकारची माध्यमं निवडतात. मात्र, आपल्या विचारांना समाजासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी गज्वींनी नाटकाचं माध्यम निवडलं. हे माध्यम त्यांनी समर्थपणे पेललंही! आपल्या लिखाणाचं मोल ते जाणून होते. आपले विचार समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचवताना अन्य साहित्यिकांप्रमाणे ते कधी आक्रस्ताळे झाल्याचं मात्र मी पाहिलं नाही. ते कधीही टोकाची किंवा वादग्रस्त अथवा प्रचारकी थाटाची भूमिका (घ्यायची म्हणून) घेतानाही दिसले नाहीत. आपल्या विचारांना त्यांनी नेहमीच ठामपणे मांडले.

“गहान’, “तन माजोरी’ “किरवंत’, “घोटभर पाणी,’ आणि “देवनवरी’ सारख्या नाट्यकृतींतून आपली मते परखडपणे, ठामपणे मांडणारे, समोरच्याशी असलेले मतभेदही स्पष्टपणे मांडणारे लेखक म्हणूनच गज्वींची आज ओळख आहे.त्यांच्या “घोटभर पाणी’चे लेखन सामर्थ्य मोठे. कोणतेही फॉर्मचे बंधन नसलेले हे नाटक सामर्थ्यशालीच आहे. शब्दांची अचूक निवड आणि सभ्यतेची मर्यादा न ओलांडणारे, एक विशिष्ट समाजभान असलेले नाट्यलेखक म्हणून गज्वींचे योगदान इतके मोठे आहे की, मराठी नाट्यपरंपरेचा इतिहास लिहिताना गज्वींना वगळून पुढे जाताच येणार नाही.

प्रस्थापित बुद्धिजीवी, शहरी मानसिकतेचा वर्ग आणि ज्या वातावरणातून गज्वी येतात, ती पार्श्‍वभूमी यात कुठेही “कल्चरल क्‍लॅश’ (सांस्कृतिक संघर्ष) दिसून येत नाही. आपण नाटकातून मांडत असलेल्या विचारांची कडू गोळी नाटकाच्या कॅप्सुलमधून समाजाच्या गळी उतरवणं गज्वींना फार छान साधलं आहे. ज्यांनी खूप दु:ख भोगलेलं आहे, त्यामधली सत्यता आणि त्या सत्यतेशी प्रामाणिक राहात तो विचार, ते जीवन ज्या प्रगल्भतेनं गज्वी शब्दांत मांडतात, त्याचं रंगमंचावरचं रूप रसिकांना नक्कीच भावतं. त्यात अतिवास्तववादीपणा नसतो, तर असतो एक निखळ प्रांजळपणाच! सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गज्वींची लेखनशैली ही कमालीची चित्रदर्शी आहे. एखाद्या गेय कवितेत जशी त्या कवितेची चाल अनुस्यूत असते, त्याप्रमाणेच नाटक लिहीत असतानाच गज्वींना ते प्रसंग रंगमंचावर कसे दिसतील, याचं म्हणजे सादरीकरणाचंही भान असतं; ते मोलाचे आहे.

ज्यासाठी गज्वींनी आजवर आपली लेखणी झिजवली त्या प्रबुद्ध रंगभूमी, दलित रंगभूमीसाठी (खरं तर असे वर्ग पाडण्याच्या मी विरोधात आहे) काही भरीव कार्य करण्यासाठी आणि आपले विचार अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी गज्वींना आता एक विशाल व व्यापक तसेच प्रतिष्ठेचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या भाषणात त्याचे प्रतिबिंब पडल्याचे नक्कीच पहायला मिळेल. रंगकर्मींना दिशादर्शक आणि समाजाला मार्गदर्शक असं विचारप्रबोधन ते आता करू शकतील, अशी प्रेक्षकांची, नाट्यकर्मींची रास्त अपेक्षा असणार आहे. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी आणि शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संमेलनांसाठी ते भरीव काही नक्कीच करतील, अशी आशा आहे.

अजूनही गज्वींच्या लेखनाचा आणखी व्यापक पातळीवर गौरव व्हायला हवा. त्यांचं साहित्य राष्ट्रीय पातळीवरही जायला हवं. त्यांच्या नाटकांचे विविध भाषांत अनुवादही व्हायला हवेत. खरं तर गज्वी लिहून मोकळे झाले आहेत. आता रंगकर्मींनीच त्यांचा विचार विविध भाषांत पोहोचवला पाहिजे. आगामी 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनातही गज्वींच्या नाटकांचा महोत्सव व्हावा. एकूणच संपूर्ण समाजाने गज्वींची नाटके आणि त्यांचे माणुसकीला प्रथम महत्त्व देणारे विचार स्वीकारले आहेत. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे त्यांना मिळालेला हा गौरव आहे, अशी माझी समजूत आहे.
(शब्दांकन : श्रीनिवास वारुंजीकर)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)