प्रासंगिक- दर्पण : मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ

अमर शेंडे

आज 6 जानेवारी. बरोबर 187 वर्षांपूर्वी मराठीतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण मुंबईमधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरी केले. त्या निमित्त दरवर्षी हा दिवस सर्वत्र “पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. मराठीतील सुरू झालेले हे वृत्तपत्र होते तरी कसे, याचा संक्षिप्त आढावा अमर शेंडे लिखित प्रकाशित होणाऱ्या बाळशास्त्रींच्या चरित्रातून घेतला आहे.

पाश्‍चिमात्य शिक्षण विस्तारण्याच्या काळात सुशिक्षित वर्गाला पाश्‍चिमात्य शिक्षण व संस्कृती जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली होती. या विषयाची अधिकाधिक माहिती करुन घेण्यासाठी मराठीतही वृत्तपत्र असावे याची जाणीव प्रामुख्याने झाली. कारण वृत्तपत्र हे लोकसंपर्काचे प्रभावी व परिणामकारक माध्यम आहे, यावर बुुद्धिजीवी वर्गाचा विश्‍वास होता. ज्ञानाचा प्रसार होण्यासह सरकारमध्ये काय चालले आहे, हे लोकांना समजावे व लोकांना काय म्हणायचे आहे, हे सरकारला समजावे, यासाठी मराठी भाषेतही वृत्तपत्र हवे या विचाराने बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी रघुनाथ हरिश्‍चंद्रजी व जर्नादन वासुदेवजी यांच्या सहकार्याने दि बॉम्बे “दर्पण’ या नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र मुंबई येथून सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वृत्तपत्रात एका बाजूस इंग्रजी मजकूर असे व दुसऱ्या बाजूस त्याच मजकुराचे मराठीत भाषांतर असे. “दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा सरकारचे वृत्तपत्रांवर नियंत्रण कडक होते. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता व वृत्तपत्र विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी होती. “दर्पण’ची मासिक वर्गणी दोन रुपये होती व तिमाही वर्गणी 6 रुपये होती.ती त्याकाळी जास्त असून देखील “दर्पण’चे 300 च्या वर वर्गणीदार होते. त्या काळच्या बॉम्बे गॅजेट व बॉम्बे कुरिअर या ब्रिटिश वृत्तपत्रांचा खप 400-500 प्रतींचा होता. त्या तुलनेत “दर्पण’ची प्रगती व लोकप्रियता अभिमानास्पद होती. इंग्रजांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी विविध सामाजिक विषयावर नि:पक्ष लेख, अग्रलेख प्रकाशित केले. त्यामुळे “दर्पण’ला इंग्रजी राजवटीत प्रतिष्ठा तर मिळालीच; शिवाय दर्पणचा दबदबाही निर्माण झाला होता.

“दर्पण’ वृत्तपत्र सुरु करण्यामागची आपली भूमिका जांभेकर यांनी 12 नोव्हेंबर 1831 रोजी लिहिली व तो लेख “दर्पण’च्या पहिल्या अंकात प्रकाशित केला. ते लिहितात, “स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा, आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे. तेथील ज्ञान प्रसिद्ध व्हावें अशा नात्याने या वर्तमान पत्राचा उद्योग मुख्यत्वे आरंभिला आहे. असे एक वर्तमानपत्र पाहिजे की ज्यात मुख्यत्वेंकरुन एतद्देशीय लोकांचा स्वार्थ होईल. ज्यापासून त्यांच्या इच्छा आणि मनोगते कळतील, जवळच्या प्रदेशातील आणि परकीय मुलखात जी वर्तमाने होतात ती समजतील. आम्हास भरवसा आहे की, आमचे इष्ट इंग्रज लोक व सुज्ञ स्वदेशीय लोक या उद्योगास सहाय होऊन तो सफल होईल, असे करतील, म्हणोन आम्ही प्रार्थना करतो की, सर्व लोकांनी कृपा करुन आम्हास मदत करावी.

वृत्तपत्र नव्हे तर अवलोकनपत्र

“दर्पण’ने लोकांचे प्रश्‍न मांडताना कोणत्याही दबावाखाली काम केले नाही. एखादे वृत्त मिळवण्यासाठी त्या काळात आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नसताना देखील अतिशय कमी साधनांच्या साह्याने “दर्पण’मध्ये विविध विषयांवर संशोधनात्मक व उपयुक्त माहिती देण्यावर भर दिल्याचे दिसते. याच अनुषंगाने दर्पणमधून शेती विषयक लेखातून शेतकऱ्यांना नवीन जीन्नस व शेती करण्याची आधुनिक पद्धती बोली भाषेत सरकारने सांगितली तर शेतकऱ्यांच्या कल्याणाबरोबर देशाची प्रगती होईल,विद्या-विज्ञान व नवनिर्मिती, लोकांवर सरकारने विश्‍वास दाखवून लोकांच्या मोठ्या अधिकारावर नेमणुका व्हाव्यात अशी मागणी करतात. जकातीचा प्रश्‍न, पर्यटन व्यवसाय, लोकांच्या आर्थिक व्यवहारासाठी व बचतीसाठी पेढी सुरू करावी, सरकारातील अधिकारी वर्गाने सरकारात काम करणाऱ्या ऐतदेशीय गृहस्थास आदराने लिहावे, असे ते सांगत.

“दर्पण’मधील अशा लेखांतून व अग्रलेखातून बाळशास्त्रींची समाजाप्रती असणारी आस्था व समाजाच्या प्रश्‍नाची जाण प्रखरतेने जाणवते. “दर्पण’मधून स्त्रियांच्याबाबतीत अनेक प्रश्‍नावर लिखाण केले आहे. यामध्ये सती प्रकरण, हिंदू विधवा पुनर्विवाह, जातिभेद, मुलींची मुंज का नाही, असे विषय हाताळले आहेत.

“दर्पण’ला त्या काळी एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती की, मुंबईमध्ये प्रसिद्ध होणारी बंगाली, गुजराथी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे आपल्या अंकात “दर्पण’मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या व लेख पुन:प्रकाशित करत असत. वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक र. के. लेले लिहितात की, “मराठीतील पहिले वृत्तपत्र “दर्पण’ हे एकमेव वृत्तपत्र आहे, जे त्याकाळच्या वृत्तपत्रांना मार्गदर्शक ठरेल व त्यांचे नेतृत्व करण्यास सक्षम ठरेल.

जनसेवेची जांभेकरांची तळमळ

मराठी भाषा त्यावेळी प्रगत नव्हती. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेची प्रगती सुरू होती. त्यामुळे मराठी भाषेच्या दर्जाबाबत अपेक्षा न करता “दर्पण’ मधील मराठी लिखाण हे सर्व सामान्यांसाठी होते हे महत्त्वाचे. “दर्पण’च्या संपादन, मालकी व कामकाजाविषयी विविध संदर्भ आढळत असले तरी जांभेकरांच्या अतिशय मौलिक संपादनाखाली “दर्पण’ची जनतेप्रती सेवा करण्याची असलेली तळमळ आणि इच्छा ही अतिशय मनापासूनची आणि नि:पक्षपाती होती. वृत्तपत्रलेखक, विचारवंत, समाजसुधारक आणि ज्ञानसंपादन करण्यासाठी प्रेरणादायी आहे, असेही लेले शेवटी लिहितात.

अशा या अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठा मिळालेल्या “दर्पण’ने 20 जून 1840 रोजीच्या आपल्या अंकात “द लास्ट फेअरवेल’ या नावे लेख लिहून या वर्तमानपत्राचे प्रकाशन बंद करून ते युनायटेड सर्व्हिस गॅझेट मध्ये विलीन करण्यास पसंती राहील असे नमूद केले आहे. त्या लेखाच्या सारांश भागात ते लिहितात, “आठ वर्षापासून अस्तित्वात असलेल्या “दर्पण’चे संचालक सर्व वर्गणीदारांना कळवू इच्छितात की, वाचकांची वर्तमान संख्या, त्यांची सर्वसाधारण वाढ थांबल्यामुळे या वृत्तपत्राचे “युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल’मध्ये विलीनीकरण करण्यास प्रथम पसंती राहील.
एकंदरीत दर्पण बंद होण्यासाठी अपुरे उत्पन्न व मर्यादित खप, शासनाचे कडक नियम यासह सामान्य माणसास न परवडणारी वर्गणी हीच प्रमुख कारणे असावीत असे अभ्यासकांच्या संशोधनातून दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)