प्रासंगिक: डॉ. आंबेडकर व लोकशाही

प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन! डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही सामाजिक न्यायमूल्याची जपणूक करणारी सर्वसमावेशक विचारधारा आहे. लोकशाही हा सरकारचा प्रकार नसून सामाजिक संस्थेचा प्रकार आहे. डॉ. आंबेडकरांना सामाजिक लोकशाहीचे प्रतिबिंब भारतीय लोकशाहीमध्ये रूजवायचे होते. त्यांनी लोकशाहीप्रमाणेच सामाजिक न्यायाच्या कल्पनेला आपल्या विचारात अग्रस्थान दिले. ज्यांच्याजवळ ऐकण्यासारखे काही नाही त्यांचे बोलणे लोकशाहीने सन्मानपूर्वक ऐकले पाहिजे, यामध्येच सामाजिक लोकशाहीचे मर्म दडले आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्‍वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महान तत्त्ववेत्ता, थोर विचारवंत, कायदेपंडित, दलित साहित्याचा प्रेरणास्रोत, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, देशप्रेमी व देशभक्‍त असे बहुआयामी असलेले व्यक्‍तिमत्त्व आहे. एकूणच संपूर्ण राजकीय व्यवस्थेसंबंधी परखड मत व्यक्‍त करत, व्यासंगी विचारांच्या या उदारमतवादी व सुधारणावादी महामानवाने लोकशाहीसंबंधीचे क्रांतिकारी विचार जनमानसापर्यंत पोहोचविले. त्यांच्या मते, लोकशाही म्हणजे मूलत: समाजाची एक रचना आहे. मनुष्य आणि पशू यातील अंतर म्हणजे संस्कृती होय आणि सुसंस्कृत मन जोपासणे लोकशाहीचे अंतिम उद्दिष्ट आहे. जिथे मानवी समूहांना मानवी हक्क नाकारले जातात तेथून मानवी हक्‍काच्या प्राप्तीसाठी संघर्ष करणे या पहिल्या पायरीपासून फुले-आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. याउलट टिळक-गांधींचा मानवी हक्क नाकारलेल्यांसाठी नसून जुन्या सत्ताधाऱ्यांचा नवीन सत्ताधाऱ्यांशी होता. म्हणून फुले-आंबेडकरी लोकशाही संकल्पना व टिळक-गांधी-नेहरू यांची संकल्पना यात मूलत: फरक आहे.

-Ads-

डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही सामाजिक न्यायमूल्याची जपणूक करणारी सर्वसमावेशक विचारधारा आहे. लोकशाही हा सरकारचा प्रकार नसून सामाजिक संस्थेचा प्रकार आहे. डॉ. आंबेडकर लोकशाहीची व्याख्या अशी करतात की, “ज्या सरकारी पद्धतीमध्ये लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक स्थित्यंतरे रक्‍तपाताशिवाय घडवून आणण्यात येतात ती म्हणजे लोकशाही होय.’ भारतात लोकशाही आहे; परंतु त्या लोकशाहीने बुद्धी चालविणे स्थगित केले आहे. डॉ. आंबेडकरांना सामाजिक लोकशाहीचे प्रतिबिंब भारतीय लोकशाहीमध्ये रूजवायचे होते. त्यांनी सामाजिक न्यायाच्या कल्पनेला आपल्या विचारात अग्रस्थान दिले. ज्यांच्याजवळ ऐकण्यासारखे काही नाही त्यांचे बोलणे लोकशाहीने सन्मानपुर्वक ऐकले पाहिजे. यामध्येच सामाजिक लोकशाहीचे मर्म दडले आहे.
सामाजिक जीवन हे सांस्कृतिक जीवन प्रवाहातून विभक्‍त करता येत नाही.

शिक्षणापासून वंचित व झोपडीत राहणाऱ्या माणसाचे दु:ख प्रकट करणारा विचार हा त्यांच्या सामाजिक विचाराचा सुवर्णधागा होय. त्याचे राजकीय समाजशास्त्र लोकशाहीच्या सामर्थ्यातून प्रकटणारे आहे. नवसमाजरचनेच्या या युगप्रवर्तकाच्या मते, “येथील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विषमतेची मुळे एकमेकांमध्ये इतकी गुरफटली आहेत की, वरवरच्या मलमपट्टीने किंवा काटछाटीने त्याचा उच्छेद करता येणार नाही. सामाजिक व आर्थिक लोकशाही राजकीय लोकशाहीचे फायबर आहे. सामाजिक लोकशाहीच्या बेसमेंटशिवाय राजकीय लोकशाही म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यात उभी केलेली इमारत होय. सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या आडव्या-उभ्या धाग्यांनीच राजकीय लोकशाहीची वस्त्रे विणली जातात.’ सामाजिक परिवर्तनाची कृतीशील लढाई लोकशाहीच्या माध्यमातून लढण्याचे त्यांचे धोरण निश्‍चित होते.

भारतातील लोकशाही वाचवायची असेल तर प्रतिगामी विचाराच्या लोकांच्या विळख्यातून वाचविणे आवश्‍यक आहे. आधुनिक लोकशाहीचे ध्येय एखाद्या अनियंत्रित राज्यकर्त्याचे अधिकार कमी करणे हे नसून, लोकांचे कल्याण साधणे हे आहे. लोकशाहीमध्ये सामाजिक समता, विरोधी पक्षाचे अस्तित्व, कायदा व प्रशासनामध्ये साधर्म्य, संवैधानिक नैतिकतेचे पालन व सार्वजनिक विवेक असणे आवश्‍यक आहे. अल्पसंख्याकाच्या हिताला संरक्षण देण्याचे सौजन्य बहुसंख्याकाजवळ असणे हेच प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणत. ह्याचवेळी अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांचा आदर करणेही गरजेचे आहे. घटनाबाह्य मार्गाचा अवलंब करणे म्हणजे अराजकाचे राजकारण होय. जनतेनी आर्थिक व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. लोकशाही कधीही हिंसेचा आदर करीत नाही; त्याचप्रमाणे समानतेशिवाय स्वातंत्र्याचीही कल्पना करता येत नाही. अन्यथा राजकीय लोकशाही धोक्‍यात येईल.’

“विषमताग्रस्त, शोषित व पिडीत जनता राजकीय लोकशाहीचे स्वरूपच उधळून लावतील. विषमतेची झळ लागलेला वर्ग राजकीय लोकशाहीचे कवच फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा घटना समितीसमोर डॉ. आंबेडकरांनी दिला होता. भारताची लोकशाही व लोकांच्या सार्वभौमत्वासाठी आवश्‍यक असणारी मानसिकता तळागाळातील जनमानसात निर्माण करणाऱ्या प्रचंड व मजबूत कार्याचा पाया फुले-आंबेडकरांनी घातला आहे. राज्यघटनेला लोकसत्ताक राज्याची बैठक देण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी पूर्ण केले.

लोकशाहीमध्ये शक्‍तीचा वापर जनप्रतिनिधी लोकशाहीच्या चौकटीत राहून करतात. लोकशाही संघर्ष करणाऱ्या प्रक्रियेची एक प्रणाली आहे. यामध्ये परिणामाची अनिश्‍चितता असल्याने इच्छित प्राप्य प्राप्त करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो.

डॉ. आंबेडकरांच्या कल्पनेतील लोकशाहीमध्ये कायद्याची अधिसत्ता, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता व बंधूता ही गतिमान तत्त्वे आहेत. समाजपरिवर्तनाचे सामर्थ्य लोकशाहीमधील सामाजिकता व नीतिमत्ता या प्रमुख दोन घटकांमध्ये आहे. राजकारणात “व्यक्‍तिपूजा’ हा अध:पतनाचा मार्ग ठरतो. तसेच एकपक्षीय शासनही जुलूमशाहीचे निमंत्रणच ठरते. खास अधिकार असलेल्या व खास अधिकार नसलेल्या लोकांत फरक करणे लोकशाहीशी हानिकारक व विसंगत असते. वर्गीय समाजरचना लोकशाहीला मारक असल्याने उच्च राजकीय उद्दिष्टे सामाजिक ध्येयाशी सुसंवादी असावीत, असे डॉ. आंबेडकर म्हणतात.

लोकशाही लोकांना आपल्यामध्ये राष्ट्रीय एकता, एकात्मता व अखंडता टिकवून ठेवण्याची हमी देते. भारतीय लोकशाही लवचिक व मजबूत असल्याने कार्यक्षम आहे. बौद्ध संघ राजकीय संघाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रक्रियेवर आधारित असल्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या विचारामधील लोकशाहीची मूळ संकल्पना बौद्ध विचारधारेमधील आहे. भूतकाळातील ऐतिहासिक पुराव्यास समर्थन देऊन आधुनिक लोकशाहीचा पाया बळकट केला असल्याने प्राचीन भारत हे जगाचे स्वामी होते, असे डॉ. आंबेडकर मानतात.

लोकशाही हा “त्रिकालाबाधीत सर्वोत्तम शासन प्रकार’ नसल्याचे नमूद करून वर्ष 1938 मध्ये ते म्हणाले होते की, “तत्कालीन देशातील परिस्थितीमध्ये ती अनुचितसुद्धा ठरू शकते. स्वातंत्र्यामुळे शक्‍तीसंपन्न गट अडाणी, अज्ञानी व दुर्लक्षित घटकांचा छळ व पिळवणूक करू शकतात. स्वातंत्र्याचा गवगवा करणारी ही लोकशाही गरिबांच्या विपन्नतेमध्ये अधिकाधिक भर घालते. लोकशाहीतील स्वातंत्र्य समतेला गिळून टाकते.

सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल सामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आपले आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारातील बंधुभाव लोकशाहीचेच दुसरे नाव आहे. हा शासनसंस्थेचा प्रकार नसून एकत्रित जीवनाची ती पद्धती होय. डॉ. आंबेडकरांच्या लोकशाहीवरील निष्ठेकडे कोणतेही मानवतावादी राष्ट्र दुर्लक्ष करू शकत नाही. त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानाच्या सुरुवातीलाच उद्देशपत्रिकेमध्ये पाहावयास मिळते. यशस्वी लोकशाहीविषयक विचार राजकारण्यांसहीत प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे हेच क्रांतिकारी महामानवाला अभिवादन ठरणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)