प्रासंगिक: कर्तृत्ववान सावित्रीबाई फुले

माधुरी तळवलकर

आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस! आजच्या काळाशी तुलना करता सावित्रीबाईंनी ज्या काळात द्रष्टेपणानं, जिद्दीनं स्त्री-शिक्षणाची सुरुवात केली तो काळ फार वेगळा होता. आजची स्त्री कल्पनाही करू शकणार नाही अशी केविलवाणी परिस्थिती 150 वर्षांपूर्वी स्त्रीची होती. सावित्रीबाई शिकल्या त्या काळात, कोणत्याही कुटुंबातील मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. जोतिबांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थानातील मुलींच्या पहिल्या शाळेसाठी शिक्षक मिळेनात. तेव्हा सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका झाल्या. त्या सामाजिक परिस्थितीत ही घटना अभूतपूर्व होती. घराकडून शाळेत जाताना सनातनी लोक त्यांची टिंगलटवाळी करीत. चिखल फेकीत, घाण टाकीत, दगड मारीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोतिबांनी सावित्रीबाईंना शाळा सुरू करून दिली खरी; पण सनातन्यांच्या विरोधाला घाबरून सावित्रीबाईंनी कच खाल्ली नाही. सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सावित्रीबाईंचा सक्रिय सहभाग असे. 1877 साली महाराष्ट्रात दुष्काळाने कहर केला. शेतकरी आणि गरीब वर्ग हे परिस्थितीमुळे हैराण झाले होते. जोतिबांनी ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडली. या संपूर्ण कार्यात सावित्रीबाईंनी स्वतःला झोकून दिले.

म. फुले व सावित्रीबाई यांनी, फसवल्या गेलेल्या स्त्रियांकरिता व मुले तिथे ठेवण्यासाठी एक बालहत्या प्रतिबंधकगृह स्थापन केले. सावित्रीबाईंच्या जबाबदारीवरच हे कार्य म. फुलेंनी सुरू केले. जोतिबांशिवाय सावित्रीचे कर्तृत्व अधुरे आहे; मात्र सावित्रीबाईंच्या माणुसकीने फुल्यांचेही कर्तृत्व वाढले. हाती घेतलेले कार्य ज्या तडफेने सावित्रीबाईंनी तडीस नेले ते एकट्या जोतिबांना सावित्रीबाईंच्या सहकार्याशिवाय शक्‍य होते का?

सावित्रीबाईंनी मुंबई येथे नाभिक समाजाची विराट सभा भरवली. तिथे 14 एप्रिल 1890 रोजी सर्व नाभिकांनी विधवांच्या केशवपनाची रानटी चाल बंद करण्याचा निर्धार केला. या चळवळीस इंग्लंडमधील महिलांनी पाठिंबा दिला.
म. फुले यांनी 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी आपली इहलोकीची यात्र संपवली. त्यावेळी सावित्रीबाई 60 वर्षांच्या होत्या. लिहिता-वाचतासुद्धा न येणाऱ्या सावित्रीचे एका कर्तृत्ववान, करुणामय प्रगल्भ स्त्रीत रूपांतर झाले होते. त्यांनी जोतीरावांनी स्थापलेल्या सर्व संस्थांची व्यवस्था हाती घेतली.

1896 साली महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळ पडला. अशा दुर्धरप्रसंगी सावित्रीबाईंनी सरकारला रिलीफ कामे काढायला लावली. 1897 मध्ये प्लेगने हाहाकार माजवला. सावित्रीबाई घरोघरी जाऊन त्या लोकांना धीर देत होत्या. रोग्यांना डॉक्‍टरकडे घेऊन जात होत्या. त्यांची शुश्रूषा करीत होत्या.

अखेर व्हायचे तेच झाले. प्राणांची पर्वा न करता आजाऱ्यांची सेवा करीत असताना 10 मार्च 1897 या दिवशी मृत्यू आला. आपले उभे आयुष्य ज्यांनी दीन-अनाथांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी वेचले; इतकेच नव्हे तर त्यांना सुशिक्षित व समर्थ केले, त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. त्यांच्यासारख्या समाजसुधारकांनी केलेल्या कार्यामुळेच आज स्त्रिया सुशिक्षित आणि स्वावलंबी झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)