#प्रासंगिक: “ओझोन होल’बाबत वस्तुस्थिती काय आहे? 

नित्तेन गोखले 
1980 च्या दशकात स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोन थरात ओझोन होल (छिद्र) निर्माण होतात, तसेच ओझोन थर कमी होत असल्याचा दावा पुराव्यांसकट काही वैज्ञानिकांनी केला. या दाव्यास समर्थन देण्यासाठी कोणते पुरावे दिले गेले होते? कोणी यातील तथ्य तपासली होती का? आज दि. 16 सप्टेंबरला जगभर पाळल्या जात असलेल्या “ओझोन दिना’निमित्त विशेष लेख 
वैज्ञानिकांनी 1970 च्या दशकात वायू प्रदूषण आणि रसायनांचा पृथ्वीभोवतालच्या ओझोन थरावर होणाऱ्या प्रभावावर अभ्यास सुरू केला. त्यात असे आढळून आले की, वसंत ऋतुदरम्यान अंटार्क्‍टिक प्रदेशावरील ओझोनचा थर घटून ओझोन होल (छिद्र) निर्माण होतात. अंटार्क्‍टिक प्रदेशातील थंड वातावरणामुळे छिद्र पाडण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्‍यता वर्तवली गेली होती. ओझोनच्या थरावर (ओझोन निर्मितीवर) हवेतील फ्रिऑन्स, क्‍लोरोफ्लुरो कार्बन्स (सीएफसी) चे प्रमाण वाढत असल्याने परिणाम होत आहे. हे गॅस व रसायनांचे प्रकार, अग्निशमन यंत्र, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनिंग सिस्टम, प्लॅस्टिक फोम, ऍरोसॉइल स्प्रे इत्यादी गोष्टींमध्ये आजही काही देशात वापरली जातात.
हवेतील ही रसायने शतकानुशतके वातावरणात राहू शकतात असेदेखील सिद्ध करण्यात आले. यामुळे सर्वच देशांची झोप उडाली होती, खासकरून, फ्रिऑन्स आणि सीएफसी वर चालणारी उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांची. या संशोधनाचे श्रेय जाते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जो फार्मन यांना. वर्ष 1985 मध्ये त्यांनी ओझोनचा थर वेगाने कमी होत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. सन 1975 आणि 1984 च्या कालावधीत अंटार्क्‍टिकावरील ओझोनचा थर सुमारे 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले होते. फार्मन यांचा हा शोध विसाव्या शतकातील सर्वात मोठा शोध मानला जातो.
अमेरिकेच्या नासा या संस्थेचे दिग्गजदेखील त्यांच्या उपग्रहांच्या मदतीने याचा शोध लावू शकले नव्हते. अनेक लोक जो फार्मन यांचे संशोधन लपवण्याचा प्रयत्न करत होते, अगदी त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा. पण शेवटी, नेचर सायन्स जर्नलचा भाग म्हणून फार्मन यांचा पेपर, मे 1985 दरम्यान, प्रकाशित झाला.
ओझोन होल संदर्भातील दाव्यास समर्थन देण्यासाठी कोणते पुरावे दिले गेले होते? 
अमेरिकन शास्त्रज्ञ मारियो मोलिना, पॉल क्रुटझन व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1970 च्या दशकात क्‍लोरोफ्लुरो कार्बन्स आणि ओझोन थरामध्ये रासायनिक प्रतिक्रिया होते हे सिद्ध केले होते. यामुळे ओझोन नष्ट होऊ शकतो हे दर्शविण्यासाठी काही खास पुरावे उपलब्ध करून देण्यास ते असमर्थ ठरले होते. तसेच, त्यांना रासायनिक उद्योगांच्या मालकांकडून होणाऱ्या दबावाचा देखील सामना करावा लागत होता. सीएफसीच्या जागी दुसऱ्या रसायनांचा वापर करण्यास कारखाने उत्सुक नव्हते.
यानंतर 1984 दरम्यान जो फार्मन, आणि त्यांचे सहकारी जोनथन शेंक्‍लिन, ब्रायन गार्डिनर यांनी वसंत ऋतूदरम्यान अंटार्क्‍टिक प्रदेशावरील “ओझोन होल’चा शोध लावला. तथापि, त्यांनी ही माहिती जगासमोर आणण्याआधी अंटार्क्‍टिक प्रदेशात अनेक चाचण्या केल्या. त्यांनी उपग्रहांवरील प्रतिमांसह अनेक पुरावे इतर वैज्ञानिकांपुढे उलट तपासणीसाठी मांडले. फार्मन यांचा पेपर प्रकाशित झाल्यानंतर शेवटी “नासा’ने स्वतःची चूक मान्य केली व उपग्रहांमार्फत मिळालेल्या डेटामध्ये ओझोन होल दिसत होते, पण “सॉफ्टवेअर गडबडीमुळे’ त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी कबुली दिली.
सध्या, दरवर्षी “नासा’कडून या संदर्भात माहिती पुरवली जाते. उपग्रहांनी टिपलेल्या ओझोन होलच्या प्रतिमा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात नासाच्या “ऑरा’ उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार सन 2005 च्या तुलनेत, अंटार्क्‍टिकाच्या हिवाळ्यातील ओझोन छिद्र चक्क 20 टक्‍क्‍यांनी लहान झाले आहे. शास्त्रज्ञ डॉ. सुसान स्ट्रॅहान यांच्या मते, यामागे सीएफसीच्या वापरातली घट कारणीभूत आहे.
ओझोनला घातक ठरणाऱ्या रसायनांची निर्मिती आणि वापर बंद करण्याचा संकल्प 
फार्मन यांच्या संशोधनामुळे सर्वच देशांनी ओझोन थरावर होणारा प्रभाव थांबवण्यासाठी तातडीने काही पावले उचलण्याचे ठरवले. यासाठी सन 1987 मध्ये “मॉंट्रियल प्रोटोकॉल’ स्वीकारून अनेक देशांनी आपल्या देशात सीएफसी, हायड्रोफ्लोरो कार्बन्स व इतर ओझोन नष्ट करणाऱ्या रसायनांची निर्मिती आणि वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा संकल्प केला. भारताने देखील या वायूंच्या वापरावर बंदी घातली आहे. स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचे झालेले नुकसान साधारण 2070 पर्यंत भरून येईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र, “पॅरिस हवामान करारा’तून बाहेर पडलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील “मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ला आपला पाठिंबा व निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ओझोन थर कमी झाल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतील? 
ओझोनचा स्ट्रॅटोस्फिअरवरील थर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांना पृथ्वीवर पोचण्यापासून रोखतो. या हानिकारक अतिनील-बी विकिरणांमुळे गंभीर आरोग्य समस्या, शेतजमिनीचा नाश, तापमानात बदल, तसेच प्राण्यांवरदेखील परिणाम होतो. जिनिव्हा, स्वित्झर्लंडस्थित “जागतिक हवामान संघटना’ यांचा 2015 मधला अहवाल अतिनील किरणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विस्तृत प्रकाश टाकतो. त्यानुसार, स्ट्रॅटोस्फिअर ओझोन (ओझोन लेयर) कमी झाल्याने अनेक देशात त्वचा कर्करोगाचे प्रमाण गेली काही वर्षे वाढले आहे. यूव्ही-बी विकिरणांच्या संपर्कात अनेक वर्षे राहिल्याने नॉन-मेलेनोमा कर्करोग (त्वचा कर्करोग) होतो.
अतिनील-बी विकिरण डोळ्याच्या काही भागांसाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे डोळ्यांची बाहुली कायमची खराब करणारे मोतीबिंदू देखील होऊ शकतात. प्रयोगाअंती असे आढळले की, अतिनील-बी विकिरणांमुळे बकऱ्या, गायी, मांजरी, कुत्री, मेंढी व प्रयोगशाळेतील इतर प्राण्यांना देखील कर्करोग होतो. अनेक प्रकारचे समुद्री मासे आहारासाठी सागरी फायटोप्लॅंक्‍टनवर अवलंबून असतात. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा फायटोप्लॅंक्‍टनवर देखील परीणाम होतो. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युनेप) च्या तज्ज्ञांच्या मते ओझोनमध्ये 16 टक्‍के घट झाल्यास जगातील 5 टक्‍के फायटोप्लॅंक्‍टन नष्ट होईल. यामुळे दरवर्षी 7 दशलक्ष टन मासे मच्छिमारांना कमी मिळतील.
स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचे प्रमाण कमी होत असल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या यूव्ही-बी विकिरणांचा वनस्पतींवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे फुले नष्ट होतात, वनस्पतींची आणि झाडांची वाढ रोखली जाते व वेगवेगळे रोग सुद्धा होतात. यूव्ही-बी विकिरणांमध्ये जैवविविधता आणि प्रजाती नष्ट करण्याची क्षमता आहे.
“युनेप’च्या अनुमानाप्रमाणे, स्ट्रॅटोस्फिअर ओझोन थरात 10 टक्के घट झाल्यास कॅन्सर रोग्यांचे प्रमाण दरवर्षी सुमारे 250,000 ने वाढेल. एखाद्या व्यक्तीची रोगांवर मात करण्याची क्षमता त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. अतिनील-बी विकिरणांच्या संपर्कात राहिल्यामुळे रोगप्रतिकारक प्रणालीची परिणामकारकता कमी होते. यामुळेच, त्वचेचे रोग तसेच शरीराच्या इतर भागांना देखील संसर्ग होऊ शकतो. दर वर्षी सप्टेंबर 16 हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून पाळला जातो. पण दुर्दैवाने, ओझोनचे नुकसान करणाऱ्या वायूंच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली गेली असली तरीदेखील यांचा चीनसारख्या देशात त्याचा गुपचूप वापर केला जातो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
3 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)