प्रासंगिक: अरुणा ढेरे : सार्थ, समयोचित निवड 

श्रीनिवास वारुंजीकर 

आगामी वर्षात 11 ते 13 जानेवारीदरम्यान यवतमाळ येथे होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यातील संवेदनशील कवयित्री, साक्षेपी लेखिका आणि नामांकित संशोधक अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. पारंपरिक आणि वादग्रस्त अशा निवडणूक प्रकियेमुळे अनेक नामांकित साहित्यिक या सन्मानापासून दूर राहिले होते. आता नव्या प्रक्रियेनुसार अशा खऱ्या ज्ञानवंतांचाच गौरव होईल, असे मानता येईल. 

यवतमाळ येथे होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुणा ढेरे या विदुषीला मिळाल्याने त्या नक्‍कीच अभिनंदनास पात्र आहेत. मराठी साहित्य विश्‍वात एक संवेदनशील कवयित्री आणि अभ्यासू संशोधक म्हणून ख्याती असलेल्या अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, अशी समस्त मराठी साहित्य रसिकजनांची इच्छा होती. मात्र, “आपण कधीही निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही/ कोणाकडेही मतांचा जोगवा मागत फिरणार नाही’ अशी सडेतोड भूमिका अरुणा ढेरे यांनी सातत्याने घेतली होती. ती रास्तही होती. अगदी अशीच भूमिका दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांच्यासह अनेकांनी घेतली होती. साहित्य संमेलन म्हटले की वाद आणि त्यातच अत्यंत लोकशाहीविरोधी असलेली निवडणूक प्रक्रिया, प्रचाराची घसरलेली पातळी, राजकारण्यांना लाजवणारी एकमेकांवरील चिखलफेक यामुळे अनेक प्रतिभावंत या सन्मानापासून आजवर वंचित राहिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या धुरिणांनी पुढाकार घेत, महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करुन, महामंडळाच्या अखत्यारीतील साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची एक 20 जणांची समिती संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करेल, असे ठरवले. या प्रक्रियेविषयीही, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेकांचे आक्षेप असले तरिही, या नव्या प्रक्रियेद्वारे अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान अरुणा ढेरेंच्या रूपाने एका सार्थ आणि समर्थ साहित्यिकाला मिळाला असल्याने साहित्यविश्‍वात आनंदाची लहर नक्कीच निर्माण झाली आहे.

संतसाहित्याचे अभ्यासक आणि साक्षेपी संशोधक “महाराष्ट्र भूषण’ रा. चिं. ढेरे यांच्या कन्या असलेल्या अरुणा ढेरे यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 साली पुणे येथेच झाला. मराठी विषयामध्येच पदव्युत्तर तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.)पर्यंतचे त्यांचे सर्व शिक्षण पुण्यातच झाले. अरुणा ढेरे यांच्या घरातच साहित्याला पोषक वातावरण असल्याने त्यांना बालपणापासून साहित्य, समीक्षेची वैचारिक पार्श्‍वभूमी लाभली आहे. पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून 1983 ते 88 या काळात कामही केलेले आहे.

अरुणा ढेरे यांचा मूळ पिंड हा कवयित्रीचा असून त्यांची पहिली ओळख तीच आहे. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भाषा संशोधन विभागाची सूत्रे सध्या त्यांच्याकडेच आहेत. “निरंजन’, “प्रारंभ’, “मंत्राक्षर’ आणि “यक्षरात्र’ अशा कवितासंग्रहांमधील त्यांच्या कविता म्हणजे मराठी कवितेचे दालन समृद्ध करणाऱ्या रचना आहेत.

सुनीता देशपांडे यांच्या निकटच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक अधिक समृद्ध झाली आहे असे मानले जाते. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. या शिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा “विस्मृतिचित्रे’ हा ग्रंथ अतिशय गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे.

नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान मिळवलेल्या अरुणा ढेरे यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार मिळालेला असून मसापचा 2017 सालचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांच्या “स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला मिळालेला आहे. तसेच “मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या शिवाजी सावंत साहित्य पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.

मराठी साहित्यविश्‍वात आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या अभ्यासपूर्ण लेखन आणि समीक्षेच्या त्या सच्च्या पाईक आहेत. लेखननिष्ठा आणि अचूक संदर्भ तपासण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न, दर्जेदार विषयांची असोशी यामुळे अरुणा ढेरे यांचे लेखन हे वाचनीय, रंजक आणि ज्ञानात भर टाकणारे असते, हा सर्वसामान्य वाचकांचा अनुभव आहे.

स्त्री लिखित मराठी कविता आणि स्त्री लिखित मराठी समीक्षा या त्यांच्या दोन ग्रंथांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून, शांता शेळके यांच्यासमवेत त्यांनी केलेले सर्वोत्कृष्ट मराठी प्रेमकवितांचे संपादनही गाजले होते. कुसुमावती देशपांडे (1961), दुर्गा भागवत (1975), शांता शेळके (1996) आणि डॉ. विजया राजाध्यक्ष (2001) यांच्या पंक्तित आता आणखी एका दिग्गज लेखिकेचे नाव अरुणा ढेरेंच्या रुपाने दाखल झाल्याने, 91 वर्षांच्या साहित्य संमेलनाच्या परंपरेला एक आगळे-वेगळे वलय प्राप्त झाले आहे. व्रतस्थ लेखन, मराठी भाषेमधील पूर्वसूरींची कामगिरी, माहितीचा स्फोट होण्याच्या कालखंडात आजवर ढळू न दिलेली जीवननिष्ठा आणि संशोधनाचा व्यासंग याचा विचार करता, अरुणा ढेरे यांची ही निवड अतिशय सार्थ आणि समयोचित आहे, असे म्हणता येवू शकेल.

मराठी भाषेतील परंपरा, प्रयोग आणि बोलीभाषांची रुपे, त्यामधील बारकावे या आणि अशा विविध विषयांना अरुणा ढेरे यांच्याकडून अधिक चालना मिळेल आणि जाता-जाता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेलाही त्या गती देतील, अशी अपेक्षा समस्त मराठीप्रेमी व्यक्‍त करत असतील. अरुणा ढेरे त्यांच्यावरील ही नवीन जबाबदारी समर्थपणे पेलतील, याबद्दल तीळमात्रही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)