#प्रासंगिक:नभ स्पर्शं दीप्तम्‌ : चौथी शक्तिशाली वायुसेना 

स्वप्निल श्रोत्री 
आज 8 ऑक्‍टोबर हा भारतीय वायु सेनेचा 86 वा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी वर्ष 1932 ला ब्रिटिशांनी भारतीय वायु सेनेची स्थापना केली होती. भारतीय वायु सेना हे भारतीय लष्कराचे एक प्रमुख अंग असून भारताच्या हवाई सुरक्षितेचे काम करते. 
आज भारतीय वायुसेनेचा वर्धापनदिन असून ही सशस्त्र सेना भारताचा व भारतीयांचा अभिमान आहे. युद्धाच्या निर्णायक क्षणीसुद्धा संपूर्ण युद्धाचे पारडे फिरवण्याची क्षमता असलेली भारतीय वायु सेना पाकिस्तान व चीन यांसारख्या परंपरागत शत्रू उरात धडकी भरविण्यास आणि सार्वभौम भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास निश्‍चितच सक्षम आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी 1950) पूर्वी भारतीय वायु सेना ही “रॉयल इंडियन एअर फोर्स’ या नावाने ओळखली जायची. परंतु स्वतंत्र भारताने 26 जानेवारी 1950 रोजी एक अध्यादेशाद्वारे वायु सेनेच्या नावातून “रॉयल’ हा शब्द काढून तिचे “भारतीय वायुसेना’ (इंडियन एअर फोर्स) असे नामकरण केले. “नभ स्पर्शं दीप्तम्‌’ हे भारतीय वायु सेनेचे ब्रीदवाक्‍य असून त्याचा अर्थ “गौरवाने आकाशाला स्पर्श करा,’ असा होतो. हे घोषवाक्‍य श्रीमद्‌ भगवद्‌गीतेच्या 11 व्या अध्यायातून घेतले आहे, संपूर्ण विश्वाला भारतीय वायुसेनेचे खरी ओळख दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली. वर्ष 1939 ते 1945 या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना विजय मिळवून देण्यात भारतीय वायुसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ष 1932 च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या 86 वर्षाच्या काळात भारतीय वायु सेने अभिमानास्पद कामगिरी करत अमेरिका, रशिया, चीननंतरची जगातील चौथी शक्तिशाली वायुसेना होण्याचा मान मिळवला आहे. स्थापनेपासून ते आजपर्यंत भारतीय वायुसेनेला 73 प्रकारच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या विमानांना उडविण्याचा अनुभव असून त्यात अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या विमानांचासुद्धा समावेश आहे.
भारतात सध्या वायुसेनेचे 5 विभाग असून पश्‍चिम विभागाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे मध्य विभाग आहे, शिलॉंग येथे पूर्व विभाग, जोधपूर येथे दक्षिण-पश्‍चिम विभाग तर तिरुवनंतपुरम येथे दक्षिण विभाग असून हे सर्व विभाग हे लढाऊ विमाने व शस्त्रांनी सज्ज आहेत. भारताच्या हवाई सीमेची सुरक्षा हे सर्व विभाग करीत असून जवळपास 1,700 विमानांसह जवळपास सव्वा लाख अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या मदतीस आहेत.
वर्ष 1947 मध्ये काश्‍मीरमधील युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणे, तसेच वर्ष 1965, 1971 व 1999 च्या कारगिल युद्धात विजय मिळविणे यांसारख्या लष्करी कारवाईमध्ये भारतीय वायु सेनेने निर्णायक भूमिका बजावली आहे. वर्ष 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाबाबत भारतीय पराभवाची जी काही प्रमुख कारणे देण्यात येतात, त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे वायुसेनेचा वापर न करणे, असे दिले जाते. त्यानंतर तीन वर्षांत झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारने वायु सेनेच्या बळाचा पुरेपूर वापर करून घेतला व त्याचा परिणाम फक्त विजयात न होता भारतीय लष्कराला लाहोरपर्यंत धडक मारण्यात झाला.
एल 1-78, सी-130 जे सुपर हार्क्‍युलिस, बोईंग सी-17 ग्लोबमास्टर, तेजस, जॅंग्वार, मीग-27, मिराज 2000, मीग-21, मीग-29, सुखोई एसयु- 30 एमकेआय ही जगातील प्रतिष्ठित लढाऊ विमाने असून नव्याने येणारे “राफेल’ हे विमान हवाई दलाच्या सामर्थ्यात भरच घालणार आहे. त्याचबरोबर एमआय-25/एमआय-35, एमआय-26, एमआय 17 व्ही 5, चेतक, चिताह, ही लढाऊ हेलिकॉप्टर व पायथन 5, केएच-59, आर:550 मॅजिक, एएस-30, मार्शल, मिका, आर 73, अस्त्र, आसरम, एक्‍झोकेट, नाग (रणगाडा विरोधी) व रडारविरोधी ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेची ताकद वाढवितात.
भारतीय वायुसेनेबाबतीत उल्लेखनीय… 
स्वतंत्र भारताचे पहिले वायु सेना प्रमुख सुब्रतो राय मुखर्जी हे होते. तर मार्शल अर्जन सिंह हे भारतीय वायु सेनेचे पहिले व एकमेव पंचतारांकित अधिकारी होते. फिल्ड मार्शल किंवा मार्शल ही लष्करातील अत्यंत दुर्मिळ पदवी असून ह्या पदावरील व्यक्तीचे सर्व अधिकार हे निवृत्तीनंतरही कायम राहतात.
क्षमतेच्या बाबतीत भारतीय वायुसेना जगातील कोणत्याच देशाच्या मानाने कमी नसून जगातील चौथी ताकदवान वायुसेना असून सातवी सर्वात मोठी सेना आहे. वायु सेनेचा पश्‍चिम विभागात सर्वात मोठा विभाग असून त्याच्या अंतर्गत 16 एअर बेस येतात. तसेच सियाचीन हिमनदीच्या युद्धभूमीवर भारतीय वायुसेनेचा एअर बेस असून तो जगातील सर्वात उंचावरील एअर बेस आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 22,000 फूट आहे.ताजकिस्तान जवळील फर्कहोर एअरबेस स्टेशन हा भारताचा पहिला एअरबेस आहे जो परदेशात आहे. या वायुसेनेत जगातील इतर वायुसेनांपेक्षा महिलांची संख्या अधिक असून वर्ष 1990 मध्ये हेलीकॉप्टर व मालवाहू विमान उडवण्याची जबाबदारी महिला पायलटसनी पार पाडली. हवाई दलाच्या लढाऊ पायलट विंगमध्ये सहभागी होण्यासाठी तीन अत्यंत कठीण प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)