प्रामाणिकपणा हा कलेचा आत्मा आहे – चित्रकार मिलिंद मुळीक

पुणे – प्रामाणिकपणा हा कलेचा आत्मा आहे. चित्रकलेतील बारकावे टिपण्यासाठी तुम्हाला एखाद्या दृष्याची अनुभूति येणे फ़ार महत्वाचे असते. एखादे दृष्य पाहाताना त्यावेळेसचे वातावरण, प्रकाश, हवेतील तापमान या सगळ्या गोष्टीतील बदल टिपता आले पाहिजेत. विषेशत: जलरंगामधे काम करताना वेग फ़ार महत्वाचा असतो असे मत चित्रकार मिलिंद मुळीक यांनी व्यक्त केले.
वाचन जागर महोत्सवनिमित्त राजहंस अक्षरधारा बुक गॅलरी येथे आयोजित चित्रसंवाद या कार्यक्रमात मुळीक बोलत होते. चित्रकार राहुल देशपांडे यानी मुळीक यांना जलरंगाच्या चित्रांविषयी अनेक तांत्रिक प्रश्नसुध्दा विचारले. त्याविषयी बोलताना अतिशय सोप्या भाषेत त्यांनी जलरंगामधे काम करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, याची तपशिलात माहिती दिली.
मुळीक म्हणाले, कोणत्याही कलेत यशस्वी होण्यासाठी मुळातच त्या कलेची मनापासून आवड असणे, त्यासाठी लागणारे सातत्य आणि चिकाटी फ़ार महत्वाची असते. एखादे चित्र काढताना कधीकधी मनासारखं जमलं नाही तर नवोदित चित्रकार निराश होतात. पण निराश न होता, सातत्याने काम करत राहणे, महत्वाचे आहे.
परदेशातील प्रदर्शनाच्या वेळचे अनुभव सांगताना ते म्हणाले, एकदा एका वृध्द महिलेने माझ एक चित्र विकत घेतले. सुरवातीला मला वाटले, कि ही महिला खूप श्रीमंत असेल. पण नंतर लक्षात आले कि ही महिला अतिशय गरिब आहे. वृध्दापकाळात मिळणाऱ्या पेन्शनमधून दरमहा ही महिला थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवते आणि चित्रप्रदर्शन भरल्यावर एखादे चित्र विकत घेतेच. चित्रकला जगली पाहिजे, यासाठी चाललेला तिचा हा प्रयत्न होता. अशा गोष्टी अनुभवल्यानंतर मी आणखी काय बोलणार ?
असा हा चित्रसंवाद चालू असतानाच मिलिंद मुळीक यांनी बघता बघता जलरंगातील चित्र काढून रसिकांची मने जिंकली.
पाहूण्यांचे स्वागत ज्योत्स्ना परांजपे आणि अक्षरधाराच्या रसिका रठिवडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश जाधव यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)