प्राध्यापकांना संशोधनासाठी तब्बल पाच पट निधी वाढ

 

“अस्पायर’साठी 7 कोटींची तरतूद

नवसंशोधक, प्राध्यापकांना मिळणार प्रोत्साहन

व्यंकटेश भोळा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवसंशोधक व प्राध्यापकांना संशोधनासाठी तब्बल पाच पट निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीद्वारे साचेबंद संशोधन न होता नवे ऍप्लिकेशन, पेटंट पुढे येण्यास मदत होणार आहे. यापूर्वी प्राध्यापकांना संशोधनासाठी सरसकट 3 लाख रुपये निधी मिळायचा. आता मात्र 15 लाखांपर्यंत रुपये निधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालय परिसरात संशोधनपूरक वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठाने संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने “अस्पायर’ हा संशोधनात्मक प्रकल्प सुरू केला आहे. “अस्पायर’ म्हणजेच “असिस्टन्स बाय एसपीपीयू फॉर प्रोजेक्‍ट -बेस्ड इनोटिव्ह रिसर्च’ होय. पूर्वी “बीसीयूडी रिसर्च प्रोजेक्‍ट स्कीम’ या नावाने हा प्रकल्प होता. आता त्यातील नियमावली व मार्गदर्शक तत्वे बदल करून “अस्पायर’ सुरू करण्यात आला. नव्याने रूजू झालेले शिक्षक अर्थात नवे संशोधकांसाठी “रिसर्च मेंटारशिप प्रोग्रॅम’ आणि प्राध्यापकांसाठी “इम्पॅक्‍ट ओरिएन्टेड रिसर्च स्कीम’ अशा दोन गटांद्वारे निधी संशोधनकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सायन्स, फार्मसी आणि अभियांत्रिकी शाखेच्या नव संशोधकांना 3 लाख, तर अन्य विद्याशाखेच्या संशोधकांना 2 लाख रुपये दिले जाणार आहे. या स्कीमच्या पात्रतेसाठी संशोधकाचे वय जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत मर्यादा आहे. सायन्स, फार्मसी आणि अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना 15 लाखांपर्यत, तर अन्य विद्याशाखेसाठी 6 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात “अस्पायर’साठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संशोधनात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, अशा प्राध्यापकांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्राध्यापकांनी केवळ संशोधन करून चालणार नाही. या निधीच्या माध्यमातून नवे ऍप्लिेकेशन तयार करणे, पेटंट निर्माण व्हावेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रसिद्ध व्हावे, हाच यामागचा उद्देश आहे. ह्या उद्दिष्टाची परिपूर्ती झाली तर विद्यापीठाची रॅकिंगही वाढणार आहे. त्याचा फायदा विद्यापीठाला होणार आहे. ‘

ऑनलाइनद्वारे प्रोजेक्‍ट सादर करण्याची सुविधा
पुणे विद्यापीठाच्या होमपेजवर “अस्पायर’ ही स्वतंत्र पोर्टल निर्माण करण्यात आले. त्यावर आणि टिचर प्रोफाइलमध्ये प्राध्यापकांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक खुली करण्यात आली. त्यावरून लॉग-इन आयडी करून अर्ज ऑनलाइन सादर करावेत. तसेच एखादा प्रोजेक्‍ट मंजूर झाल्यास, त्यासाठी रक्‍कम ही संबंधित महाविद्यालयाच्या बॅंकेत जमा केले जाणार आहे. त्यामुळे निधीही पारदर्शकता राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निधी दोन वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने दिला जाणार असून, त्याचा हिशेब विद्यापीठाकडे सादर करणे आवश्‍यक आहे.

प्राध्यापकांनी संशोधनात गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्या प्राध्यापकांना जास्तीत जास्त 15 लाखांपर्यत निधीची तरतूद आहे. त्यातून नावीन्यपूर्ण संशोधनास चालना मिळेल आणि त्याचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे निर्माण होईल. याद्वारे निर्माण होणारे संशोधन “रिसर्च पार्क’शी जोडले जाणार आहे. त्याद्वारे समाजोपयोगी संशोधनातून नवे प्रकल्प हाती येऊ शकतील.
– डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष.

केवळ पदोन्नतीसाठी नव्हे, तर संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी काही नव्याने निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल करण्यात आले. संशोधनाचा फायदा समाजासाठी होणे आवश्‍यक आहे. “अस्पायर’च्या माध्यमातून एक-दोन वर्षात प्राध्यापकांद्वारे उत्तमोत्तम संशोधन निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
डॉ. एन. एस. उमराणी , प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)