प्राध्यापकांच्या साडेनऊ हजार जागा रिक्‍त

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात 9 हजार 511 प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. सध्या प्राध्यापकांच्या भरतीस बंदी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापकांची भरती उठवावी, अशी शिफारस राज्य शासनाकडे केली आहे. रिक्‍त पदांमुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने 25 मे 2017 पासून प्राध्यापकांची भरती बंद केली आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात अनेक प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. राज्यात एकूण 1 हजार 172 अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्राध्यापकांची 9 हजार 511, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 8 हजार 798 पदे रिक्‍त आहेत. एकूण 18 हजार 309 पदे महाविद्यालयात रिक्‍त आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी दिली.
तासिका तत्वावरील मानधनही वेळेवर दिले जात नाही. त्यांच्या मानधन वाढीचा प्रस्तावही प्रलंबित आहे. प्राध्यापकांची भरती बंद असल्याने महाविद्यालयांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिक्‍त पदांमुळे महाविद्यालये चालविणे कठीण झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्राध्यापकांच्या नियुक्‍तीस परवानगी मिळावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
या पार्श्‍वभूमीवर धनराज माने म्हणाले, प्राध्यापकांच्या भरतीस मुभा मिळावी, याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यावर राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय होईल. मात्र राज्यात अनुदानित महाविद्यलायात शिक्षक व शिक्षकेतरांची रिक्‍त पदांची संख्या 18 हजार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-

प्राध्यापक वेतनाच्या प्रतीक्षेत
पुण्यातील वरिष्ठ महाविद्यलायात प्राध्यापकांना डिसेंबर महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. शासनाकडून वेतनाची रक्‍कम न आल्याने प्राध्यापकांचे वेतन रखडले आहे. यासंदर्भात, प्राध्यापकांच्या वेतनाची रक्‍कम आजच प्राप्त झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर येत्या चार-पाच दिवसांत प्राध्यापकांचे वेतन होतील, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)