प्राध्यापकांचे उपोषण तात्पुरते स्थगित

दिवाळीनिमित्त कार्यालयांना सलग सुट्ट्या असल्यामुळे निर्णय

पुणे – राज्यातील मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे सात दिवसांपासून सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त शिक्षण विभागाच्या कार्यालयांना सुट्ट्या असल्यामुळेच हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता मिळालेल्या 53 कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना 100 टक्‍के अनुदान मिळावे या मागणीसाठी कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालयासमोर 1 नोव्हेंबरपासून प्राध्यापकांनी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनात प्रा. राजेश वैद्य, प्रा. सुमीत कलमे, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. आसाराम अवचार आदींनी सहभाग होता. राज्यातील 100 प्राध्यापकांनी या आंदोलनाला पाठींबा देऊन उपस्थिती लावली होती. आंदोलनाच्या कालावधीत शिक्षणमंत्री, उच्च शिक्षण सचिव, उच्च शिक्षण संचालक या सर्वांना वारंवार निवेदनेही देण्यात आली. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.

राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून अद्याप कोणताही अभिप्राय आलेला नाही. अभिप्राय आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या महाराष्ट्र राज्य कृती समितीला केली होती. मात्र, आंदोलक उपोषणावर ठाम राहिले होते.

…तर पुन्हा आंदोलन
दिवाळीनिमित्त मुंबई मंत्रालयातील व पुणे शहरातील शिक्षण विभागाच्या सर्वच कार्यालयांना सलग सहा दिवस सुट्ट्या आल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये कोणतेच शासकीय कामकाज व निर्णय होणार नाहीत, असे गृहीत धरून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य कृती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. डी. मुंडे, सचिव प्रा. जयेश पाटील, संपर्कप्रमुख पी. एस.स्वामी, डॉ. आर. व्ही. शिंदे यांनी जाहीर केले आहे. दिवाळीनंतर शासनाने अनुदान देण्याबाबत तत्काळ ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

 

सलग सात दिवसांच्या उपोषणामुळे चार प्राध्यापकांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांना रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आता या सर्वांची प्रकृती ठिक आहे.

– प्रा. जयेश पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)