प्राधिकरणावर विराजले “सदाशिवराव’

– अधिक दिवे

पिंपरी – कोणत्याही पदावर आपल्याच गोटातील कार्यकर्त्याची वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या “राम-लक्ष्मण’ जोडीला राज्याचे कारभारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्‍वासात न घेताच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदाची “आकाशवाणी’ केली. त्यातच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णायक “डाव’ टाकल्यामुळे सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विराजमान होता आले. या नियुक्‍तीद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज केल्यानंतर “हम करे सो कायदा’ अशा आविर्भावात असलेल्या भाजप आमदार द्वयीला पक्षश्रेष्ठींनी सूचक इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी शहराध्यक्ष असलेल्या सदाशिव खाडे यांना संधी देत पक्षाने जुन्या-नव्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षातील “आयाराम’ लोकांची मक्‍तेदारी असल्याचे आरोप करीत जुन्या कार्यकर्त्यांनी कायम रान पेटते ठेवले. त्यामध्ये सदाशिव खाडे अनेकदा आघाडीवर होते. महापालिका निवडणुकीत “कमळ’ फुलवल्यानंतर शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे या दोन्ही गटांनी महापौर, स्थायी समितीवरील पकड मजबूत ठेवली. लाभाची पदे दोन्ही आमदार ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले. पण, सत्तारुढ पक्षनेते, उपमहापौरपद किंवा स्वीकृत सदस्य निवडीत दोन्ही आमदारांना नमते घ्यावे लागले. त्यातच महापौर आणि उपमहापौरपद एक वर्षानंतर बदलण्याचा निर्णय झाला. मात्र, जुन्या गटाचे प्रतिनिधीत्व करणारे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या खुर्चीला दोन्ही आमदारांना धक्‍काही लावता आला नाही.

दरम्यान, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना विधान परिषद अथवा राज्यातील महत्त्वाच्या महामंडळावर संधी देण्याबाबत आमदारांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले होते. त्यामुळे प्राधिकरणावर पानसरे यांची निवड निश्‍चित मानली जात होती. मात्र, सदाशिव खाडे यांना संधी देवून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असलेली पक्षाबाबतची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. खाडे यांच्या “निष्ठेला’ न्याय मिळू शकतो, तर आपलाही आगामी काळात विचार होईल, असा संदेश पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, जुन्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून येता येणे शक्‍य नसेल, पण पक्षात नव्याने आलेल्यांची अस्वस्थता वाढवण्याचे काम जुने कार्यकर्ते प्रभावीपणे करतात.

याचा अंदाज महापालिका निवडणुकीत पक्षश्रेष्ठींना आला होता. त्यामुळेच जुन्या फळीत “उपद्रवी’ कार्यकर्त्यांचे पुन:र्वसन करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यातच राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांच्या मदतीने बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे खाडे यांनी “फिल्डिंग’ लावली. तसेच, स्व. गोपीनाथ मुंडे यांचा कट्टर कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या खाडे यांना ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उघडपणे मदत केली. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर खाडेंचे पारडे जड झाले होते.

दोन्ही आमदारांमध्ये अस्वस्थता
भाजपला महापालिकेतील सत्ता मिळवून देण्यात आमदार जगताप आणि लांडगे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला बंडाचा झेंडा आमदार लक्ष्मण जगताप यांनी फडकवला. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी “अपक्ष’ निवडणूक लढवत भोसरीत राष्ट्रवादीचे पानिपत केले. वास्तविक, या दोन्ही नेत्यांचे नेतृत्त्व बंडखोरीतून उदयाला आलेले आहे. प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करुन राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या या दोन्ही नेत्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी डावलणे रुचणारे नव्हते. स्वीकृत सदस्य त्यानंतर प्राधिकरण नियुक्‍तीबाबत पक्षाने दोघांच्या शिफारसींचा विचार केला नाही. परिणामी, दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडसह मावळ आणि शिरुरमध्ये दोन्ही नेत्यांचा वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे जगताप-लांडगे यांची अस्वस्थता भाजपला परवडणारी नाही, असे राजकीय संकेत दिसत आहेत.

जुन्या पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा
महापालिका निवडणुकीत 3 सदस्य असलेल्या भाजपने 75 नगरसेवक निवडून आणले. त्यामध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांचा वाटा निश्‍चित आहे. पण, निर्विवाद यश मिळवण्यात दोन्ही आमदार आणि पानसरे यांनी योगदान दिले आहे, हे नाकारुन चालणार नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांवर पक्षातील “आयारामां’मुळे अन्याय झाला, अशी ओरड नेहमी होते. मात्र, सध्यस्थितीला शहर भाजपमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा आहे. खासदार अमर साबळे यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे. ऍड. सचिन पटवर्धन राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांना ताकद दिली आहे. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी माऊली थोरात आणि ऍड. मोरेश्‍वर शेडगे यांना संधी दिली आहे. तसेच, उपमहापौरपदी शैलजा मोरे यांना जबाबदारी दिली होती. त्यातच आता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांना संधी देवून भाजप पक्षश्रेष्ठींनी जुन्या फळीतील कार्यकर्त्यांची बाजू भक्‍कम केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)