प्राधिकरणाला मिळेना वाहनतळासाठी ठेकेदारPimpri-Chinchwad news

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विविध पेठांमधील वाहनतळांचे आरक्षण विकसित करण्याचा निर्णय प्राधिकरण प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सहा भूखंड वाहनतळासाठी भाडेकराराने देण्याबाबत निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, त्याला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की प्राधिकरण प्रशासनावर ओढावली आहे.

प्राधिकरणाकडून भूखंडांचा विकास रखडल्याने त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. यामध्ये वाहनतळासाठी आरक्षित भूखंडांचाही समावेश आहे. एकीकडे प्राधिकरणातील काही पेठांमध्ये वाहनतळासाठी जागा उपलब्ध नसताना दुसरीकडे अतिक्रमणे वाढत चालली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्राधिकरण प्रशासनाने वाहनतळाचे भूखंड विकसित करुन ते भाडेकराराने ठेकेदारांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 4 मोशी, पेठ क्रमांक 7 भोसरी, पेठ क्रमांक 20 आणि 18 चिखली कृष्णानगर तसेच पेठ क्रमांक 25 निगडी येथील वाहनतळांचे आरक्षण विकसित केले जाणार आहे. वाहनतळांच्या आरक्षणाच्या जागा महापालिकेने विकसित कराव्यात, असा प्रस्ताव प्राधिकरणाने महापालिकेला दिला होता. त्यासाठी जागांच्या बदल्यात प्राधिकरणाने 53 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने इतके पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धा एकरपासून ते दीड एकपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या वाहनतळांच्या जागांचा विकास स्वत:च करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. त्यासाठी प्राधिकरण सभेपुढे प्रस्ताव ठेवून त्याला मंजुरी देखील घेण्यात आली आहे.

त्यासाठी वाहनतळ भूखंड भाडेकराराने देण्यासाठी प्राधिकरणाने इच्छूक व्यक्ती व संस्थांकडून ऑनलाईन पध्दतीने निविदा मागवल्या होत्या. 1 मार्च पासून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यासाठी 20 मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु, मुदतीमध्ये 6 पैकी अवघ्या 2 भूखंडासाठी ठेकेदारांनी उत्सुकता दाखवत निविदा सादर केल्या. मात्र, उर्वरीत 4 भूखंडांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने प्राधिकरणाने निविदा सादरीकरणासाठी 10 एप्रिल 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पेठ क्रमांक 7, 18, 25 आणि सीडीसी येथील वाहनतळ भूखंड भाडेकराराने देण्यासाठी प्राधिकरणाने ऑनलाईन निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर वाहनतळ विकसित करण्यासाठीचे काम लवकरच सुरू करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.

शहरामध्ये सध्या वाहनतळाचा प्रश्न भेडसावत आहे. वाहनतळाच्या समस्येवर महापालिका प्रशासन तोडगा काढू शकलेले नाही. मोशी, चिखली, भोसरी या विस्तारणाऱ्या क्षेत्रामध्ये वाहनतळाची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने वाहनतळाच्या जागांचा विकास केला तर त्याचा फायदा थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो. निविदा काढून खासगी ठेकेदाराकडून वाहनतळ विकसित केल्यास पे अँड पार्क या तत्त्वावर त्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

प्राधिकरणाचे संकेतस्थळ ठप्प
प्राधिकरणाने सहा भूखंड वाहनतळासाठी भाडेकराराने देण्याबाबत ऑनलाईन निविदा मागवल्या आहेत. मात्र, प्राधिकरणाचे संकेतस्थळच बंद असल्याने निविदा प्रक्रियेचा खोळंबा झाला आहे. बॅंडविड्‌थची मर्यादा संपल्याने प्राधिकरण संकेतस्थळ ठप्प झाले आहे. मागील तीन दिवसांपासून संकेतस्थळ बंद असताना प्राधिकरण प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. परिणामी विविध ऑनलाईन कामांसाठी प्राधिकरण संकेतस्थळाला भेट देणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून संकेतस्थळ पुर्ववत सुरु करण्याची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)