प्राधिकरणाचा राज्याभिषेक झाला कारभारी कधी?

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती होऊन महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही कोणत्याच राजकीय पक्षाचे प्राधिकरणाचे एकूण सात सदस्यांच्या नावावर एकमत होत नाही. प्रत्येक पक्षाकडून वरिष्ठ पातळीकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्‍यक होते. या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 113 (2) अन्वये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना दिनांक 14 मार्च 1972 रोजी झाली. नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे. संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध व सर्वांगिण विकास करणे. याशिवाय विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देण, हा यामागील उद्देश आहे.

-Ads-

प्राधिकरण ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे त्याच्या अध्यक्षाची राज्य सरकारकडून नियुक्ती केली जाते. 1972 पासून आतापर्यंत सर्वाधिक काळ राज्य सरकारच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांनाच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. 1995 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अगस्ती कानिटकर यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2001 मध्ये कॉंग्रेसच्या बाबासाहेब तापकीर यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते 2004 पर्यंत या पदावर होते. तेव्हापासून ते आजतागायत प्राधिकरणाचे अध्यक्षपद सनदी अधिकाऱ्यांकडेच होते.

प्राधिकरणाची स्थापना विशेष हेतून करण्यात आली असून, प्राधिकरणाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा आहे. केंद्र, राज्य व शहरातही भाजपची सत्ता असल्याने या सॉफ्ट टार्गेट राज्यमंत्री पदाकरिता आमदार लक्षमण जगताप तीव्र इच्छुक होते. मात्र, राज्य मंत्री मंडळातील महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सदाशिव खाडे यांच्या शिफारशीने प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची माळ खाडे यांच्या गळ्यात पडली. अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आता एक महिना उलटला आहे.

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार करताना राज्य सरकारने महामंडळांवरील नियुक्‍त्यांवर भर दिला आहे. त्यामध्ये मित्र पक्षांनादेखील सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारशी माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्ष निवडीनंतर आता सात सदस्यांची निवड होणे बाकी आहे. त्यामध्ये भाजपसह मित्र पक्षांचे पाच नगरसेवक व दोन अन्य सदस्यांचा समावेश असणार आहे.

प्राधिकरण सदस्य नियुक्तीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश होणार की नाही ? याची कोणतीही माहिती नाही. याबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास, तो शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल.
– राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना.

प्राधिकरण सदस्य नियुक्तीसाठी बाब वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाणार आहे. त्यामुळे ही बाब स्थानिक पातळीशी संबंधित नसल्याने नियुक्ती जाहीर होईपर्यंत सर्वांनाच वाट पहावी लागणार आहे.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते.

मित्र पक्षाला मिळणार संधी?
भाजपच्या मित्र पक्षांमध्ये रिपाइंच्या आठवले गटाच्या एका सदस्याची प्राधिकरणावर वर्णी लागू शकते. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर एकही नगरसेवक निवडून न आल्याने नगरसेवक नसलेल्या सदस्याची नियुक्ती होऊ शकते. या पक्षाच्या इच्छुकांमध्ये माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, रमेश चिमुरकर, सुरेश निकाळजे, लक्षमण गायकवाड यांचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)