प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे

उपराष्ट्रपती नायडू : विक्रम अडसूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली – शिक्षक हे राष्ट्राच्या निर्माणात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. नौतिकता आणि मुल्य हे शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षकांनी केले पाहिजे. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यैंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात केले.

यावेळी महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ या प्राथमिक शिक्षकास “राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने’ उपराष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या वतीने “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2017′ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपराष्ट्रपती, केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्य बळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव लीना रे उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, चांगल्या शिक्षकांमुळेच शिक्षण क्षेत्रात भारत उत्कृष्टतेकडे वाटचाल करीत आहे. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी शिक्षकांना आज पुरस्कृत केले जात आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बजावलेली भुमिका सर्वांना माहिती व्हावी यासाठी शासन उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले. एकेकाळी भारताची ओळख ही विश्व गुरू म्हणुन होती. भारताने जगाला अनेक बुध्दीवंत दिले आहेत. वर्तमानात विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकांसमोर असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे सांगुन उपराष्ट्रपती म्हणाले, नौतिकता आणि मुल्य हे शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षकांनी केले पाहिजे. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही उपराष्ट्रपती यांनी यावेळी केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकर यांनी मंत्रालयाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. तसेच राष्ट्रीय पुरस्कारात करण्यात आलेल्या बदलांविषयी सांगितले.

यावर्षी केंद्रीय मनुष्य बळ मंत्रालयातर्फे नवीन मार्गदर्शीका जाहीर झालेली आहे. त्यातंर्गत देशभरातील एकूण 45 शिक्षकांना यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.

अडसूळ “तंत्रस्नेही’ शिक्षक
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यामध्ये असणा-या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी महाराष्ट्रातुन करण्यात आलेली आहे. अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. आपल्या शिक्षकी जीवनात नवनवीन उपक्रम राबवून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला नवी दिशा त्यांनी दिलेली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अडसूळ म्हणाले, या वर्षीची राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अधिक पारदर्शक होती. सहशिक्षकांच्या मदतीनेच शाळेत नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आणि त्यामुळेच आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)