प्राथमिक शाळा दर्जेदार बनविणे गरजेचे

कवठे : रोटरीहॅपी स्कूल प्रोजेक्‍ट अंतर्गत कामाचे उद्‌घाटन करताना रोटरी इंडिया लिटरसी मिशनचे चेअरमन शेखर मेहता, शिक्षक व विद्यार्थी (छाया: करुणा पोळ)

शेखर मेहता : रोटरी क्‍लब हॅपी स्कूल प्रोजेक्‍ट अंतर्गत कामाचे उद्‌घाटन
कवठे, दि. 11 (प्रतिनिधी) – इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्यामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपेक्षा आकर्षक असल्याने त्यांना भुलून पालकवर्ग आपल्या पाल्याचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घेत आहे, असे प्रतिपादन रोटरी इंडिया लिटरसी मिशनचे चेअरमन शेखर मेहता यांनी काढले. ते कवठे, ता. वाई येथील प्राथमिक शाळेला रोटरी क्‍लबमार्फत पुरविण्यात आलेल्या हॅपी स्कूल प्रोजेक्‍ट अंतर्गत कामाचे उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.
कवठे, ता. वाई येथील प्राथमिक शाळेमध्ये रोटरी क्‍लबतर्फे सोलर सिस्टीम युनिट बसविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थांनी खेळामध्ये पारंगत होण्यासाठी क्रीडा साहित्य, स्वच्छ पाण्यासाठी दोन वॉटर फिल्टर, विद्यार्थ्यांसाठी शौचालय युनिट, प्रयोगशाळा साहित्य तसेच वाचनालय पुस्तके व कपाट प्रदान करण्यात आले. याचा उद्‌घाटन कार्यक्रम शेखर मेहता व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण योजना प्रकल्प संचालक नितीन थाडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्राथमिक शाळेतील शिक्षक हा पूर्ण प्रशिक्षित असून प्रत्येक वेळी त्यांना नवनवीन बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. याउलट इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक हा मराठी शाळेच्या तुलनेने कधीही कमीच प्रशिक्षण असलेला असतो. परंतु, भौतिक सुविधा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जास्त दिसत असल्याने पालक त्या शाळांच्याकडे आकर्षित होत आहेत. सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांनी एकत्र प्रयत्न करून अश्‍या भौतिक सुविधा प्राथमिक शाळांच्यामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी व आपल्या पाल्याला प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
यावेळी नितीन थाडे म्हणाले, प्राथमिक शाळांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून बोपर्डी, ता. वाई या आपल्या भागातील शाळा ही आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली आहे. प्रायोगिक तत्वावर या शाळांच्यामधील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जात असून हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तो इतर शाळांच्यामधून राबविला जाईल.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, गटविकास अधिकारी कुसुरकर, कवठे केंद्रप्रमुख राजेंद्र गायकवाड, रोटरी असिस्टंट गव्हर्नर दिलीप प्रभुणे, वाई रोटरी अध्यक्ष प्रमोद शिंदे, सेक्रेटरी अजित क्षीरसागर, माजी रोटरी अध्यक्ष दत्तात्रय घोरपडे, रोटरी जिल्हा साक्षरता चेअरमन स्वाती हेळकर, मुख्याध्यापिका सावंत, उपसरपंच संदीप डेरे, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष शशिकांत करपे, सदस्य पल्लवी गुरव, गणेश गायकवाड, आनंदराव डेरे, विकास डेरे, भुषण डेरे, दत्ता जाधव, सुभाष डेरे, प्राथमिक शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पोळ यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)