प्राथमिक शाळांतील ई-लर्निंगचा उडाला बोजवारा

कुठे चालू तर कुठे बंद : दुर्गम भागातील साहित्य पडून

पुरंदर – शासनाच्या शिक्षण खात्याने ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीवर भर दिला आहे. सर्वच शाळा डिजिटल करण्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. मात्र, वाणिज्य दराने घ्याव्या लागणाऱ्या विजेमुळे तर दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नसल्याने याचा बोजवारा उडाला आहे. ई-लर्निंग केवळ उद्‌घाटनासाठीच होते की काय असे म्हणायची वेळ आली आहे.

-Ads-

शिक्षण खात्याने संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळांना ई-लर्निंग सुविधा पुरवल्या. काही ठिकाणी शिक्षक व ग्रामस्थांच्या पुढाकारातून प्राथमिक शाळांना संगणक, प्रोजेक्‍टर, स्मार्ट टीव्ही या सारख्या सुविधा उपलब्द करून देण्यात आल्या. मात्र, याचा प्रभावी वापर या शाळांतून होताना दिसत नाही किंवा काही शाळातील संगणक तर घेतल्यापासून काही दिवसच चालले. नव्याचे नऊ दिवस संपल्या नंतर हे आज तागायत बंद आहेत. करण वीज कंपनीकडून शाळांना देण्यात येणारी वीज वाणिज्य दराने देण्यात येते. त्यामुळे येणारे भरमसाठ बिल भरणे शाळांना शक्‍य होत नाही. त्यातच काही कंपन्यानी अनेक शाळांना वापरून झालेले जुने संगणक दिले. ते आता चालत नाहीत. त्याच बरोबर दुर्गम डोंगरी भागात आजही बऱ्याच ठिकाणी इंनटरनेट सुविधा पोहचली नाही. अशा शाळांमधूनही ई-लर्निंगचा वापर होत नाही.

ई-लर्निंग चांगले असले तरी काही तरुण शिक्षकच याचा चांगला उपयोग करताना दिसून येत आहेत. ज्या ठिकाणी इंनटरनेट सुविधा नाही अशा ठिकाणी हे शिक्षक डाऊनलोड केलेले व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवतात. मात्र, काही जेष्ठ शिक्षक संगणकापासून दूर राहणेच पसंद करतात. त्यामुळे काही ठिकाणी चांगला उपयोग होता असला तरी बऱ्याच ठिकाणी ई-लर्निंग बंदच पडत चालले आहे. शासनाने यातील त्रुटींचा आभास करून नव्याने हा कार्यक्रम राबवायला हवा.

14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शिक्षणाच्या सार्वत्रिकरण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे ठरले. त्या प्रमाणे वित्त आयोगातील काही भाग शाळांच्या विकासासाठी खर्च करावा असे आदेश शासनाने दिला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींनी शाळांना संगणक डिजिटल साहित्य पुरवले. मात्र, शाळेत वीज कनेक्‍शन आहे का? शिक्षक तेवढे प्रशिक्षित आहेत का? याची खातर जमा न करता केवळ साहित्यावर खर्च करण्यात आला. त्यामुळे शाळांतून या वस्तू केवळ शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत.

सुरक्षा व दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
ई-लर्निंग सारख्या महागड्या उपकरणाची सुरक्षा करणे शिक्षका पुढे मोठे आव्हान आहे. अनेक गावातील शाळा गावाच्या बाहेरच आहेत. शाळांच्या खोल्यांना कुलूप जरी असले तरी गाव बाहेर असल्याने अनेकांनी चोरीची शक्‍यता बोलून दाखवली. तर काही शाळांमधील संगणक चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, याबद्दल तक्रार करायला शिक्षक पुढे येत नाहीत. त्याच बरोबर काही कंपन्यांनी दिलेले संगणक आता सतत बंद पडत असतात त्यांचा दुरुस्ती खर्च शिक्षकांनाच करावा लागतो. त्यामुळे अनेक जण तो सुरू न करणेच पसंद करतात.

वीज बिलासाठी शासन व वीज वितरणाची टोलावाटोलवी
राज्य शासनाने शाळांसाठी वीजबिल माफ केले असल्याचे व तसा अध्यादेश काढण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना सांगण्यात येते. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आम्हाला अशा प्रकारचा कोणताही आदेश मिळाला नसल्याचे सांगतात. त्यामुळे शिक्षकांची मोठी कुचंबना होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)