शिक्षक संघटनांकडून उपस्थित होत आहेत अनेक प्रश्न
पुणे – राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केल्यानंतर आता प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरती कधी होणार, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार, रिक्त पदांवर नेमके किती शिक्षक भरणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
तावडे यांनी फेब्रुवारीमध्ये 24 हजार शिक्षक भरती करण्याची घोषणा केली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात 18 हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले होते. पवित्र संकेतस्थळाद्वारे रिक्त पदांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, भरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार याची अद्यापही स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळेच तावडे यांच्या ट्विटर अकाउंटवरून शिक्षकभरती हा हॅशटॅग वापरून अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
रिक्त पदांचा अतिरिक्त ताण
आज महाराष्ट्रात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्याचा ताण अन्य शिक्षकांवर येतो. शाळांची आणि शिक्षणाची गुणवत्ता राहात नाही. सातवीपर्यंत शाळा आणि दोन-तीन शिक्षक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्राध्यापक भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता शिक्षक भरती कोणत्या पद्धतीने आणि कधी होणार याचा तपशील शिक्षणमंत्र्यांनी जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा