प्राचार्य पदाची धुरा “प्रभारीं’च्या खांद्यावरच

-राज्यात 40 टक्‍के कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील धक्‍कादायक स्थिती
– प्रभारी प्राचार्य “नामधारी’च; मर्जीतील व्यक्‍तींनाच अधिकार बहाल

डॉ. राजू गुरव
पुणे – राज्यातील विविध विभागात कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता ही संख्या दोन हजारांपर्यंत पोहचली आहे. यातील 40 टक्‍के महाविद्यालयांत कायमस्वरूपी प्राचार्यच नेमण्यात आलेले नाहीत. या महाविद्यालयांत “प्रभारी’ प्राचार्य हेच काम पाहत असून हे प्राचार्य केवळ नामधारीच राहिले आहेत. संस्थेच्या मर्जीतील व्यक्‍तींनाच महाविद्यालयांच्या कामकाजाचे सर्व अधिकार देण्याचा सपाटा लावला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरी व ग्रामीण अशा सर्वच ठिकाणी राजकीय मंडळी, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था यांच्याकडून नवनवीन महाविद्यालयांची शोरूम थाटली आहेत. सन 2001 नंतरची सर्वच मान्यताप्राप्त महाविद्यालये ही कायम विनाअनुदानित तत्त्वावरच कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या शुल्कांमधूनच महाविद्यालयाचा सर्व खर्च भागविण्यात येतो. शुल्क मोठ्या प्रमाणात जमा झाले तरी, त्यातून फारसा खर्च करण्याकडे संस्थांकडून सकारात्मकता दाखविली जात नाही. प्रभारी प्राचार्य, साहाय्यक प्राध्यापकांसह कार्यालय प्रमुख, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई, प्रयोगशाळा साहाय्यक, सुरक्षारक्षक या सर्वांना तुटपुंज्या पगारावरच काम करावे लागत आहे. तो पगारही नियमितपणे मिळत नाही. काही संस्थांकडून कागदोपत्री पगार जास्त दाखविला जातो. मात्र, प्रत्यक्षात तेवढा पगारच दिला जात नसल्याचेही विदारक वास्तव अधोरेखित होत आहे.

राज्यातल्या विभागांचा विचार करता पुणे विभागात 296, अमरावतीत 138, औरंगाबादमध्ये 240, जळगावमध्ये 67, कोल्हापूरमध्ये 79, मुंबईत 128, नागपूर विभागात 355, नांदेडमध्ये 155, पनवेलमध्ये 249, सोलापूरमध्ये 37 याप्रमाणे 1 हजार, 741 कायम विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यात विभागनिहाय नव्याने काही महाविद्यालये सुरू करण्यात आलेली असल्याने संख्येत आणखी वाढ झालेली आहे.

बहुसंख्य महाविद्यालयांत प्राचार्यांच्या नेमणुका या विद्यापीठाच्या नियमानुसार केलेल्याच नाहीत. वरिष्ठ महाविद्यालयात शिकविण्याचा 15 वर्षांचा अनुभव, पीएच. डी. पदवी मिळविणे, संशोधक मार्गदर्शक असणे, विद्यापीठाची शिक्षक मान्यता असणे यांसह विविध निकषात बसणाऱ्यांनाच प्राचार्यपदी नेमणे बंधनकारक आहे. मात्र, संस्थेकडून याचा फारसा गांभीर्याने कधीच विचार केला जात नाही. काही संस्थांकडून पात्रता डावलून मर्जीतल्या साहाय्यक प्राध्यापकांच्या हातीच प्रभारी प्राचार्यपदाची सूत्रे सोपविलेली आहेत. संस्थेच्या आदेशानुसारच यांना सर्व कामे करावी लागतात. या प्रभारी प्राचार्यांना केवळ सह्यांचे अधिकार असतात. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार यांना दिलेच जात नाहीत. संस्थेच्या विश्‍वासातील कार्यालय प्रमुख, वरिष्ठ लिपीक, पदाधिकारी यांनाच सर्व अधिकार संस्थेकडून देण्यात आलेले असतात. हे सर्वजण सांगतील त्याप्रमाणे प्रभारी प्राचार्यांना कामे करावी लागत आहेत.

बिनपगारी फुल अधिकारी…
विद्यापीठाला विविध प्रकारच्या नियमित कामकाजाचे अहवाल पाठविणे, विविध कार्यक्रमांचे नियोजन करणे, महाविद्यालयाचे “नॅक’ मूल्यांकन करून घेणे, विद्यार्थी व प्राध्यापक, कर्मचारी यांच्या समस्यांचा सामना करणे, संस्थेला आढावा देणे ही सर्व डोकेदुखीची कामे मात्र, प्रभारी प्राचार्यांनाच करावी लागतात. यासाठी दिवसभर त्यांना कामातच गुंतून राहवे लागते. काही महाविद्यालयात या प्राचार्यांना केवळ 15 ते 25 हजार रुपयांपर्यंतच पगार दिला जातो. ग्रामीण भागातील महाविद्यालयात, तर यापेक्षाही कमी पगार दिले जात असल्याची माहिती काही प्रभारी प्राचार्यांकडूनच समजली आहे. प्रभारी प्राचार्यांच्या नेमणुकांसाठी विद्यापीठाकडून मान्यताही घेण्यात येत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे प्रभारी पदाचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येत नाही. प्रभारी प्राचार्यांकडून अनेकदा विद्यापीठांकडे विविध मागण्यांसाठी व्यथा मांडली जाते. मात्र, विद्यापीठाकडून त्याची फारशी गांभीर्याने कधीच दखल घेतली जात नाही. विद्यापीठांना जाग कधी येणार? असा प्रश्‍नही प्रभारी प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येऊ लागलेला आहे.

 नियम डावलणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईची मागणी

कायम अनुदानित महाविद्यालयात प्रभारी प्रचार्यांच्या नेमणुका करून महाविद्यालयाचे कामकाज पुढे रेटले जाते. मात्र, या प्राचार्यांना मान-सन्मान, आर्थिक खर्चाचे अधिकार दिले जात नाहीत. त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांची पूर्तता केली जात नाही. विद्यापीठाचे नियम डावलून कायम स्वरूपी नेमणुका करण्याऐवजी प्रभारी नेमणुका करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांवर विद्यापीठांकडून कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कायम विनाअनुदानित महाविद्यालयाच्या राज्य कृती समितीकडून करण्यात येऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)