प्राचार्यांची 208 पदे भरण्यास मिळाली “एनओसी’

उच्च शिक्षण विभागाचा निर्णय : 5 महाविद्यालयाचे अपूर्ण प्रस्ताव फेटाळले

– डॉ.राजू गुरव 

पुणे – राज्यातील उच्च शिक्षण संचलनालयाअंतर्गत असलेल्या अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्‍त पदे भरण्यावरील स्थगिती राज्य शासनाने उठविली आहे. यामुळे उच्च शिक्षण विभागाकडून गेल्या 6 महिन्यात 208 महाविद्यालयांना प्राचार्य पदे भरण्याबाबत “एनओसी’ (ना-हरकत प्रमाणपत्र) देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, 5 महाविद्यालयांचे अपूर्ण असलेले प्रस्ताव फेटाळण्यातही आले आहेत.

राज्यात उच्च शिक्षण विभागाअंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी विभागाची एकूण 1 हजार 171 अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांचे पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, पनवेल, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, असे 10 विभाग करण्यात आलेले आहेत. महाविद्यालयातील प्राचार्य संवर्गातील पद हे एकाकी पद असून ते कार्यालय प्रमुखाचे पद आहे. महाविद्यालयातील दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने तसेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती प्रमाणपत्र मिळविण्यासाठी (नॅक मूल्यांकन) प्राचार्य कार्यरत असणे आवश्‍यक आहे. प्राचार्य पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांसाठीच असतो. या कार्यकाळानंतर बहुसंख्य महाविद्यालयातील प्राचार्यांची पदे रिक्त होतात. त्यामुळे दर 5 वर्षांनी प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याबाबत महाविद्यालयांना नव्यानेच सगळी प्रक्रिया राबवावी लागते.

राज्य शासनाने 23 एप्रिल 2018 रोजी प्राचार्यांची रिक्त पदे भरण्यावरील स्थगिती उठविली आहे. प्राचार्य पद भरतीकरीता “एनओसी’ (ना-हरकत प्रमाणपत्र) मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी धावही घेतली. काही महाविद्यालयांकडून कागदपत्रांच्या दस्तऐवजासह परिपूर्ण तपशीलाचे प्रस्तावच सादर करण्यात आले नाहीत. या महाविद्यालयांना त्रूटीची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण सहसंचालकांकडून अनेकदा देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनातील वाद-विवाद, प्राचार्य पदाबाबतची न्यायप्रविष्ठ प्रकरणे, प्रस्तावातील त्रूटी यामुळे प्राचार्य पदभरतीसाठी विलंब होऊ लागल्याचे उघडकीस आले आहे.

राज्याच्या विविध भागातील एकूण 260 महाविद्यालयांतील प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. 5 महाविद्यालयांच्या प्रस्तावात त्रूटी असल्याचे आढळून आले असून त्यांना त्रूटीची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही संबंधित महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयांकडून प्रस्ताव जसे दाखल होतील त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने “एनओसी’ देण्याचे काम वेगाने सुरू ठेवले आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

काही महाविद्यालयांनी उच्च शिक्षण विभागाकडून “एनओसी’ घेऊन प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात देऊन उमेदवारांकडून अर्जही मागविले आहेत. यानंतर विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत मुलाखती घेऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्याच्या हालचालीही सुरू आहेत. प्रामुख्याने ग्रामीणपेक्षा शहरी भागातील महाविद्यालयात प्राचार्य पदी काम करण्याकडे उमेदवारांचा जास्त कल असतो. यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य महाविद्यालयातील प्राचार्यांची पदे रिक्त असतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)