नगर- प्रश्‍न न सुटल्यास घाटघर धरण फोडू

गोळ्या झाडल्या तरी बेहत्तर, मरायलाही तयार, प्रकल्पग्रस्तांचा इशारा

अकोले – घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न दोन महिन्यांत न सोडविल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता हा प्रकल्प बंद करून तो बोगद्याच्या तोंडावर फोडू. यावेळी भलेही सरकारने आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालेल. आम्ही आमच्या बायकामुलांसह मरायला व जेलमध्ये जायला तयार आहोत, असा इशारा घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्थांनी दिला आहे.

घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पातील प्रकल्पग्रतांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बोगद्याच्या तोंडावर आज सकाळी दहा वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जलविद्युत प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या कुटुंबातील तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, प्रकल्पग्रतांच्या उर्वरित शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी पुरवठा करावा, प्रकल्पग्रतांच्या गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण करण्यात यावे, प्रकल्पग्रतांच्या जमिनी निवाडा प्रकरणात जमिनीला योग्य भाव द्यावा व जलाशयात बुडालेल्या फळझाडे व इतर झाडांचा मोबदला रक्कम त्वरीत द्यावी, या मागणीसाठी घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पावर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रकल्पाचे कळवा (जि.ठाणे) जलसंपदा विभागाचे उपअभियंता किरण रोटे, महसूल विभागाचे मंडलाधिकारी प्रेमकुमार पवार, संगमनेर येथील ज्येष्ठ विधिज्ञ अनिलकुमार आरोटे उपस्थित होते. राजूर येथील सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या उपस्थितीत धरण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी प्रकल्पग्रस्त देविदास खडके यांनी उपअभियंता रोटे यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. यावेळी घाटघरचे माजी सरपंच धोंडिबा सोंगाळ म्हणाले, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आम्ही कंटाळलो असून, आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्याय नाही. रमेश खडके म्हणाले, 2002 पासून आम्हाला अद्याप सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यात्वरित मिळाव्यात.

सुरेश खडके म्हणाले, प्रकल्प झाल्यापासून आमच्या नशिबी मरण यातना आल्या आहेत. यावेळी लक्ष्मण गांगड, लव्हाळवाडीचे शंकर पोकळे, शिंगणवाडीचे माजी सरपंच रावजी मधे, मनोज पोकळे, श्रीधर सोनवणे यांनी याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास येथून एकही अधिकारी व कर्मचाऱ्याला हालू देणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर तणाव कमी झाला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)