प्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली

संतप्त महापौरांनी काढली प्रशासनाची खरडपट्टी


आयुक्‍तांचे आदेश डावलून धनादेशांचे वाटप

पुणे – खडकवासला कालवा फुटल्याने 806 संसार वाहून गेले आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी तातडीने महापालिकेकडून संसारपयोगी साहित्य खरेदी करून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 27 ऑक्‍टोबर रोजी दिले होते. मात्र, यानंतरही आपत्ती व्यवस्थापन विभागाने हे साहित्य खरेदी न करताच बाधितांना धनादेश देण्याचा निर्णय आयुक्तांना कोणतीही कल्पना न देताच घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, कालवाग्रस्तांच्या या मदतीबाबत महापौरांनी विचारणा केली असतानाही चक्क महापौरांनाही अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि आयुक्त राव यांनी थेट परस्पर विसंगत माहिती देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर आयुक्‍तांनी पुढील तीन दिवसात तातडीने साहित्य खरेदी करून वाटप करण्यात येणार असल्याचे महापौरांना स्पष्ट केले आहे.

दि.27 सप्टेंबर रोजी खडकवासला मुठा (उजवा) कालवा जनता वसाहतीजवळ फुटला. या दुर्घटनेत दांडेकर पूल वसाहतीतील स. नं. 130, 134 आणि 124 मधील 806 घरांमध्ये पाणी घुसले. त्यातील 98 घरे पूर्णपणे वाहून गेली. या कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची रोख मदत देण्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली होती. मात्र, अशा पुराच्या घटनेनंतर महापालिकेस केवळ घर बांधणीसाठी पत्रे, वासे तसेच बांबू देता येतात. रोख पैसे देता येत नाहीत. रोख मदत केवळ राज्यशासनाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले होते.

त्यामुळे महापालिका नेमकी मदत कशी देणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासनाने या बाबत विधि विभागाकडून अभिप्राय मागविला होता. त्यावर वस्तू रूपाने मदत देता येणार असल्याचे अभिप्रायात स्पष्ट केले होते. त्यानुसार, या नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी 26 ऑक्‍टोबर 2018 बैठक घेत अल्पमुदतीची 3 दिवसांची निविदा राबवून या बाधितांना प्रत्येकी 11 हजारांचे संसारपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे साहित्य दिवाळी सुरू होण्यापूर्वी या बाधितांना वाटप करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. या साहित्यात बाधितांना दैनंदिन जीवनासाठी लागणारे ताट, वाट्या, कप, चमचे, पातेली, लहान मोठे-डबे, ग्लास, तांब्या, डिश, पळ्या अशा वेगवगेळ्या साहित्यांसह प्रत्येक कुटुंबासाठी चार अंथरून आणि चार पांघरून दिले जाणार होते. त्याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देण्यात आली होती. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत देण्याबाबत तातडीने खरेदी न करत, या कुटुंबाना स्वयंसेवी संस्थानी मदत केली आहे. त्यामुळे संसारपयोगी साहित्य देण्याची गरज नाही असे परस्पर निश्‍चित करत त्यांना रोख मदत देण्याचा निर्णय आयुक्तांना कल्पना न देताच घेतला.

महापौरांनी प्रशासनास घेतले फैलावर
कालवाग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याने, महापौरांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी महापौरांना कालवाबाधितांना मदतीचे धनादेश देण्यात येणार असून स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महापौरांनी आयुक्त राव यांना फोन केला. तर त्यांनी साहित्य खरेदीचे आदेश दिले असून ही खरेदी झाली असेल असे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनातच मदतीवरून विसंवाद असल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकाराने संतापलेल्या महापौरांनी सर्व संबधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)