प्रशासकीय अनास्थेमुळे “बटर फ्लाय’ पूल “जायबंदी’?

वर्क ऑर्डर निघाली : चार महिन्यांपासून कामाचा पत्ताच नाही

अधिक दिवे

पिंपरी – शहरातील विकास कामांना “गती’ देण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने “पारदर्शी’ कारभार केला. विकासकामे नियोजित वेळेत व्हावीत. यासाठी “सल्लागार’ संस्थांचा “बुस्टर डोस’ही देण्यात आला. पण, तरीही प्रशासन “ढिम्म’च आहे. थेरगाव आणि चिंचवडला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी “बटरफ्लाय’ पुलाच्या कामाची “वर्क ऑर्डर’ (कार्यारंभ आदेश) काढून चार महिने उलटले. मात्र, अद्याप पूलाच्या कामाला सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे “बटर फ्लाय’ पुलाचे पंख “जायबंदी’ झाले का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

थेरगाव प्रभाग क्रमांक 50 मध्ये प्रसुनधाम शेजारी 18 मीटर डी.पी. रस्त्याच्या कामांतर्गत थेरगाव ते चिंचवड “बटर फ्लाय पूल’ बांधण्यासाठी महापालिका स्थायी समितीने दि. 6 ऑक्‍टोबर 2017 रोजी ठराव मंजूर केला होता. संबंधित काम मे. धनेश्‍वर कंन्स्ट्रक्‍शन या संस्थेला देण्यात आले आहे. सुमारे 29 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने मान्यता देवून “वर्क ऑर्डर’ही काढली आहे. संबंधित काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित पूलाचे वैशिष्टय म्हणजे, पूलाचा “पीलर’ पवना नदीपात्रात येणार नाही. नागरिकांना निसर्ग सौंदर्य पाहता यावे. याकरीता वैशिष्ट्यपूर्ण पदपथाची व्यवस्था केली आहे. सुमारे 12 मीटर लांबीचा हा पूल असून, त्याला फुलपाखराचा आकार देण्यात येणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. काळेवाडी, चिंचवड, थेरगाव परिसरातील रहदारी या पूलामुळे सुलभ होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. जागा ताब्यात घेण्यासह सर्व्हेक्षणही झाले आहे. पुलाच्या कामाची “वर्क ऑर्डर’ निघाली आहे. 15 दिवसांपूर्वी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. महापौरांनी त्यासाठी वेळही दिली होती. पण, त्यादरम्यान महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेमुळे भूमिपूूजन पुढे ढकलण्यात आले. लवकरच भूमिपूजन होवून कामाला सुरुवात होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी दिली.

सत्ताधारी दोन नेत्यांमध्ये ठेकेदाराचे “सॅंडविच’?
सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दोन दिग्गज नेत्यांच्या ओढाताणीत बटरफ्लाय पुलाचे काम घेतलेल्या ठेकेदाराचे “सॅंडविच’ झाले आहे. पुलाच्या कामात संबंधित ठेकेदार एका भाजप नेत्याच्या विश्‍वासातील आहे. अन्य एका नेत्याने ठेकेदाराकडे काही “अटी’ ठेवल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. परिणामी, नेमका काय निर्णय घ्यावा? असा प्रश्‍न प्रशासनातील अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराला पडला आहे. त्यामुळे “वर्क ऑर्डर’ काढून चार महिने झाले तरी, प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

प्रशासनावर कोणाचा दबाव – राहुल कलाटे
थेरगाव आणि चिंचवडमधील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने “बटरफ्लाय’ पूलाचे काम महत्त्वाचे आहे. मात्र, महापालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत आहे. चार महिने झाले, तरी संबंधित ठेकेदार काम करीत नाही. सत्ताधाऱ्यांनी विकास कामांमध्ये राजकारण करु नये. ठेकेदाराची तयारी असताना काम करु दिले जात नाही, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. “पारदर्शी’ कारभार करणारे सत्ताधारी संबंधित पूलाचे काम 18 महिन्यांत कसे पूर्ण करणार आहेत? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. महापालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे संबंधित पुलाचे काम तात्काळ सुरू झाले नाही, तर पुलाच्या निर्धारित जागेवर शिवसेना आंदोलन करणार आहे, असा इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)