प्रवेश परीक्षेचा चक्रव्यूह 

– स्वाती देसाई 

प्रवेश परीक्षा हे आपले यश आणि स्वप्न यांच्यातील भिंत मानली जाते. प्रत्येकजण यशाचे शिखर गाठू शकत नाही, कारण त्याकडे वाटचाल करण्यासाठी आवश्‍यक असलेली पात्रता असेलच असे नाही. जेव्हा जागा कमी असेल तेव्हा अपेक्षा बाळगणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशा स्थितीत जीवघेणी स्पर्धेचा आपल्याला सामना करावा लागतो. आजघडीला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील स्पर्धेचा सामना करण्यासाठी पात्रता मिळवावी लागते. पात्रता मिळवणे देखील महत्त्वाची गोष्ट ठरत आहे. कारण जर पात्रता परीक्षा कठिण असेल तर ती परीक्षा उत्तीर्ण होणारे देखील बुद्धिमान असतील. अशा प्रकारे कमी आणि महत्त्वाच्या ठिकाणी अधिक प्रयत्न न करता पात्र उमेदवार प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. आजकाल प्रवेश परीक्षेसाठी विशेष वर्ग चालवले जातात. खरे पाहिले तर दैनंदिन अभ्यासातूनच प्रवेश परीक्षेची तयारी शक्‍य असते, त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज भासत नाही. मात्र प्रवेश परीक्षेबाबत पालकात आणि विद्यार्थ्यांत भयगंड निर्माण झाला असून तो दूर करणे गरजेचे आहे. बुद्धिमापन कौशल्य जाणून घेण्याबरोबरच संकटकाळातील निर्णयक्षमता देखील तपासण्याचे काम ही परीक्षा करते.

वास्तविकपणे प्रवेश किंवा पात्र परीक्षा ही आपल्या समजुतदारपणाची किंवा विद्वतेची कसोटी पाहणारी नसते. अनेकदा तर आपली सजगता आणि हजरजबाबीपणाची परीक्षा पाहणारी असते. प्रवेश परीक्षा कोणत्याही अभ्यासक्रमाची असो त्यात आपल्या बुद्धिचा कस लावणारे प्रश्‍न कधीही विचारले जात नाहीत. त्यात एरव्ही विचारले जाणारे साधारण प्रश्‍न असतात. म्हणूनच जेव्हा विद्यार्थी परीक्षा हॉलबाहेर येतात तेव्हा यावरून अकारण तणावाखाली येतात आणि सोपे प्रश्‍न असूनही किरकोळ चूका करून बसतात. कालांतराने त्यांना पश्‍चाताप होतो. सोप्या प्रश्‍नाचे उत्तर माहित असूनही गुगली प्रश्‍नावर त्यांची विकेट पडते. शब्द फिरवून प्रश्‍न विचारलेले असतात आणि तेथेच काही विद्यार्थी फसतात. जी मुले घोंकपट्टी करून प्रवेश परीक्षेचा अभ्यास करतात ते यात यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. जी मुले फारसा अभ्यास करत नाही, परंतु कॉमन सेन्सने उत्तर सोडवतात तीच मुले सहजपणे प्रवेश परीक्षा पास होतात.

तज्ञांच्या टिप्स 
अनेकदा तर प्रवेश परीक्षेचा जोरदार अभ्यास करणारे विद्यार्थी ऐनवेळी ढेपाळलेले दिसून येतात. प्रवेश परीक्षेच्या क्रॅश कोर्सला हजारो रुपये देऊनही अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळेच प्रवेश परीक्षा या एखाद्या विद्यार्थ्याची ज्ञानाची किंवा समजून घेण्याच्या कला जाणून घेण्याऐवजी तो विद्यार्थी तणावाचा मुकाबला कसा करतो याची कसोटी पाहणारी ती प्रवेश परीक्षा असते.तज्ञांनी इथे काही टिप्स सांगितल्या असून त्या आधारे प्रवेश परीक्षेची तयारी करू शकतो.

साधारणपणे प्रवेश परीक्षेतील प्रश्‍न हे लहान वर्गात शिकवलेल्या पाठ्यपुस्तकांच्या आधारावर असतात. त्यामुळे गोंधळून न जाता प्रश्‍न पाहून लगेचच सविस्तरपणे उत्तर देण्याचे टाळावे. चांगले आणि अचूक उत्तर द्यायचे असेल तर प्रश्‍न बारकाईने वाचवा आणि समजत नसेल तर तीन-चारदा वाचावा. एकदा प्रश्‍न समजल्यावर त्याचे उत्तर लिहणे सोपे जाते. प्रश्‍नातून अपेक्षित असलेले उत्तर देण्याबाबत आपण सजग असावे. जेव्हा गणीत किंवा विज्ञानातील समीकरण सोडवायचे असतील किंवा अशा प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी एखादा फॉर्म्यूला वापरायचा असेल तर रफ पेपरवर त्याचा कच्चा आरखडा काढावा. अशा रितीने फॉम्युर्ल्याची उजळणी होते आणि प्रत्यक्षात उत्तर लिहताना स्टेप्सही विसरल्या जाणार नाहीत.

याशिवाय रफ पेपरवर नोंदवून ठेवल्याने स्टेप्स आठवण्यासाठी वेळही लागत नाही. परीक्षेच्या काळात अधिक अभ्यास करण्यापासून दूर राहवे. लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणी अभ्यास करून कोणतीही मोठी परीक्षा पास होणे शक्‍य नाही. तसे पाहिले तर परीक्षा ही समुजदारपणा आणि स्मरणशक्तीत असलेल्या माहितीची कसोटी घेणारी असते आणि या दोन्ही गोष्टी एकदम मिळत नाहीत. त्यात एक प्रक्रिया आणि अभ्यासाची गरज असते. म्हणून शेवटच्या काळात भरपूर वाचन आणि लिखाण करून फारसे साध्य होणार नाही. सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य ठेवल्यास ऐनवेळी धावपळ करण्याची गरज पडणार नाही. प्रश्‍नांचे उत्तर पाल्लाळ लिहण्यापेक्षा रेखाचित्राचा आधार घ्यावा.अशा प्रकारे उत्तराचे सादरीकरण असल्यास तपासणाऱ्या व्यक्तीच प्रश्‍नाचे उत्तर समजण्यास फार वेळ लागत नाही. परीक्षकांना देखील अशा प्रकारचे उत्तर तपासण्यास मनस्वी आनंद मिळतो. अशा रितीने पेपरमध्ये सुटसुटीतपणा राहतो. एक हजार शब्दाचे काम एक चित्र करते. ही म्हण प्रवेश परीक्षेची प्रश्‍न सोडवतानाही लागू पडते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)