प्रवेशावेळी मतदार नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना “माझ्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घेईल’ असे प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची मोहीम यशस्वी होण्याची चिन्हे आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या पाहणीमध्ये मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने याबाबतची पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेताना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे प्रतिज्ञापत्र देण्याबरोबर प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांनी याबाबतची कार्यवाही करावी अशा सूचना विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत व त्यांच्या संलग्न कार्यालयांशी संपर्क साधून भेटीचा आराखडा तयार करावयाचा आहे. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांनी विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून भेटींच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करायचा आहे. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना संविधान तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील तरतुदी यांसोबतच प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)