प्रवीण तोगडियांचे राम मंदिराच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियादेखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तोगडिया यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

प्रवीण तोगडिया यांनी 32 वर्षांपर्यंत विहिंपचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, तोगडिया यांनी विहिंपचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणामध्ये सहभागी व्हावं किंवा त्यांनी राम मंदिर निर्माणासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे.

तोगडिया यांनी असेही सांगितले की,विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते, आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे 60 लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले. गुजरातमधील हजारो जणांनी यासाठी आपले योगदान दिले होते. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना तोगडिया म्हणालेत की, ”सीमेवर जवान सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत”. दरम्यान, विहिंपच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)