प्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा!

संकलन: एम. डी. पाखर

हा प्रवास आहे, एका जिद्दीचा… अगदी शून्यातून आपलं विश्‍व साकार करणाऱ्या माणसाचा… त्यांचं नाव पप्पूशेठ भळगट! अठरा वर्षांपूर्वी ते कुणीही नव्हते. पण अपार कष्टांतून त्यांनी स्वतःलाच एक नवी ओळख दिली आहे. आळंदीत आज दिमाखात उभं राहिलेलं “शुभांगी कम्युनिकेशन्स’ आपण पाहतो, पण त्यामागचा प्रवास इतका खडतर असेल हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. म्हणूनच ही खास स्टोरी!

संधी मिळाली तर काय होऊ शकतं, या आशयाची एक फिल्म पाहिली. त्यात एक मुलगा मल्टिनॅशनल कंपनीत शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी गेलेला. बायोडाटावर ई-मेल नाही म्हणून त्याला नाकारलं. नोकरी हवी तर ई-मेल आयडी हवा, त्यासाठी सायबर कॅफेत गेला तर 30 रुपये लागतील असं सांगितलं. जवळ 20 च रुपये. 20 चे 30 करण्यासाठी त्यानं टोमॅटो घेतले. दारोदार फिरून ते विकले. त्याला 40 रुपये मिळाले. पुन्हा टोमॅटो घेऊन ते विकले. असं दिवसभर केलं. 20 रुपयांचे 400 रुपये झाले. त्याला स्वतःचा व्यवसाय सापडला. तो पुढं मोठा व्यापारी झाला. या आशयावर ती फिल्म संपते. त्यातली गोष्ट काल्पनिक होती. पण पप्पूशेठ भळगट यांना भेटल्यावर त्या फिल्ममधला मुलगा प्रत्यक्षात भेटल्याचा अनुभव घेता आला. कारण पप्पूशेठ यांचं जगणं भयंकर अडचणीत असताना त्यांना 18 हजार रुपये मिळाले आणि तीच त्यांच्या प्रवासाची खरी सुरुवात ठरली…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पप्पूशेठ यांचा प्रवास मोठा खडतर आहे. मंचरजवळचं निरगुडसर हे त्यांचं गाव. वडील एका कंपनीत वॉचमन म्हणून नोकरीला. परिस्थिती गरीब. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण आष्टी तालुक्‍यातल्या कडा गावात बोर्डिंगमध्ये झालं. दरम्यान, वडिलांची दृष्टी अधू झाली. त्यांचं काम सुटलं. अशा परिस्थितीत माऊलीच आपल्याला काहीतरी आधार देईल, म्हणून ते आळंदीत आले. जबाबदारी पप्पूशेठ यांच्यावर पडली. कुणी नोकरीवर घेत नव्हतं. एक काम मिळालं, पण 100 रुपये रोजावर. त्यात भागणार कसं, म्हणून ते नाकारलं. सीडी-कॅसेट भाड्यानं द्यायचा व्यवसाय करावा, असं त्यांनी ठरवलं. पण पैसे कुठं होते? वडील म्हणाले, “त्याला संधी दे…’ आईनं रडत रडत गळ्यातला शेवटचा दागिना पप्पूशेठ यांना दिला. हेच अठरा हजार रुपये त्यांनी व्यवसायात पेरले.

पप्पूशेठ सांगतात, “”आई वडिलांनी खूप कष्ट केले. आई काच दुकानात कामाला जायची. वडील कंपनीत जाताना आम्ही त्यांना रिकामा डबा द्यायचो. कॅन्टिनमधून ते समोसा.. वडा.. असं काही भरून द्यायचे आणि मग आम्हाला खायला मिळायचं. वडिलांना डोळ्यांचा आजार. उपचाराला पैसे नाहीत. कमी दिसायला लागलं त्यामुळं नोकरी गेली. माऊलींच्या नजरेत कुणी उपाशी मरत नाही म्हणून आळंदीला आलो. 18 हजारांतून त्यातून सीडी-कॅसेटचा व्यवसाय सुरू केला. मग हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला. पण भांडवल नव्हतं. म्हणून मग गिऱ्हाईकांकडून “गोडाऊनमधून घरपोच माल देतो’ म्हणून ऍडव्हान्स पैसे घेऊन पिंपरीतून माल घेत तो घरपोच द्यायचो. अशी खूप पळापळ केली. कुणी माल उधार द्यायचं नाही आणि माल असल्याशिवाय गिऱ्हाईक यायचं नाही. त्यावेळी बॅंक ऑफ माहाराष्ट्र आळंदी शाखेनं 50 हजारांचं कर्ज दिल्यानं खूप मोठा आधार झाला. ते व्यवस्थित फेडलं आणि बॅंकेनं मला 30-40 लाखांचं कर्ज दिलं. नंतर सीडी-कॅसेटचा व्यवसाय बंद करून मोबाइलच्या ऍक्‍सेसरीज विकणं, मोबाइल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू केला. वडील तेव्हा हार्डवेअरच्या दुकानात बसायचे. पण त्यांची दृष्टी पूर्ण गेल्यानं तो व्यवसाय मी बंद केला आणि मोबाइल व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं. मुद्रा योजनेतही दहा लाख रुपयांचं कर्ज मिळालं. त्यातून नवे मोबाइल दुकानात ठेवायला लागलो. दरम्यान, रिलायन्सनंही डिस्ट्रिब्यूटरशिप दिली. त्यावेळी आळंदीतले मोबाइल व्यावसायिक माल आणण्यासाठी पिंपरीला जायचे. मग मी आळंदीत होलसेल विक्री सुरू केली. मोबाइल दुकानदार माझ्याकडून माल घ्यायला लागले. आता होलसेल आणि रिटेल अशी विक्री आपल्याकडे होते. हा सगळा व्यवसाय स्वतःच्या दुकानातून सुरू आहे. दुकान घेण्यासाठी प्रेरणा बॅंकेनं आणि घर घेण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रनं कर्ज दिलं.”

हे सगळं वाचताना सहज वाटत असलं तरी ते तितकं सहज घडलं नाही. पप्पूशेठ यांचा हा खूपच हलाखीचा प्रवास होता. कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवरही त्यांना लढायचं होतं. कौटुंबिक अशासाठी की ते आळंदीत येण्यासाठी एक कारण घडलं होतं. त्यांच्या भावानं प्रेमविवाह केला. आई-वडिलांना वाटलं की आता आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा नाही. म्हणून चिंचवड गाव सोडून ते आळंदीत आले. परिस्थिती तर गरीब होतीच. तेव्हापासून मोठ्या भावाशी या कुटुंबाचा अबोला झाला. कुटुंबातला अबोला पप्पूशेठ यांना खटकत होता. त्यामुळं काही दिवसांनंतर आई-वडील, भाऊ यांना समोरासमोर बोलावून वाद मिटवले. भावाला स्वतःच्या व्यवसायात घेतलं. इतकंच नाही तर त्याला स्वतःची एक चार मजली इमारतही बांधून दिली. आता दोघं मिळून मोबाइलचा व्यवसाय सांभाळतात.

पप्पूशेठ यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली ती 2000 साली! गेल्या 18 वर्षांच्या काळात त्यांनी 18 हजार रुपयांचे दोन अडीच कोटींच्या व्यावसायिक उलाढालीत रूपांतर केलं आहे. आज त्यांच्याकडे 13 लोक काम करत आहेत. भविष्यात त्यांना स्वतःचा पाच मजली मॉल सुरू करायचा आहे. त्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाइल आणि किराणा अशा सगळ्याच गोष्टी विकता येतील! त्यातून किमान 200 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी त्यांचं नियोजनही सुरू आहे. एक संधी मिळाली, की त्याचं दुसऱ्या संधीत, दुसऱ्यातून तिसऱ्या संधीत कसं रूपांतर करायचं, हे शिकायचं असेल तर पप्पूशेठ यांना आवर्जून भेटा…


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)