प्रवास ‘मेंढपाळ आणि मी’ या माहितीपटाचा…

मी माझ्या लहानपणी गावाकडे गेल्यावर चुलतभावंडांसोबत मेंढ्यांसोबत फिरायला जायचो. त्यांच्यासोबत त्यांच्या बिऱ्हाडावर (तंबूत) राहायचो. पण आता काळानुसार धनगर बदलत आहेत. बकरी विकून कामधंदा बघत आहेत. काही जण अजुनही बकऱ्यांचे पालनपोषण पारंपारिक पद्धतीने करत आहेत. पुढच्या काही वर्षामध्ये सगळेच धनगर त्यांची बकरी विकतील आणि काळानुसार नवीन कामधंदा शोधतील. त्यासाठीच एक धनगराच्या आयुष्यातील एक संपूर्ण दिवस चित्रित करायची माझी इच्छा होती. त्यावर माहितीपट बनवायचा होता. येणाऱ्या पिढीला कळायला हवं, की आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे बकऱ्यांचं पालनपोषण केलं. अगदी 2013 साली सुद्धा 2 किलोमीटरवर गावामध्ये लाईट असूनही कसे ते अंधारात राहत होते. या सगळ्याचं छान असं डॉक्युमेंटेशन व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि यातून सुरुवात झाली ‘मेंढपाळ आणि मी’ या माहितीपटाच्या निर्मितीची. माझ्या आयुष्यातलं हे एक  महत्वपूर्ण असं वळण असेल हे मात्र मला तेव्हा माहिती नव्हतं. मी फक्त जिद्दीने ठरवलेल्या गोष्टी करत गेलो. संयम ठेवत गेलो. आणि एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवात माझ्या माहितीपटाच्या निवड होईपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. 

-Ads-

खरं तर लहानपणापासूनच मला मी “धनगर’ असल्याचा खूप अभिमान वाटायचा. माझे वडील ज्ञानेश्वर साळबा कचरे शिकून सरकारी अधिकारी झाले, म्हणून मलासुद्धा शिकायला मिळालं. याची जाणीव मी जसाजसा मोठा झालो, तशी मला होत गेली. पण लहानपणी मी जेव्हा जेव्हा सुट्ट्यांमध्ये गावाला (केसुर्डीला) जायचो. त्यावेळी वाड्यावर बकऱ्यांकडे जाणं व्हायचंच. तेव्हा बकऱ्यांसोबत एक दिवसाचा फेरफटका ठरलेला असायचा. अगदी न थकता, न कंटाळता पूर्ण एक दिवस मी बकऱ्यांसोबत घालवायचो. त्यावेळी तर मला मी स्वत: एक धनगर असल्याचा अभिमान आणखीनच वाढायचा…पण जसा जसा मी शाळेतून कॉलेजात आणि नंतर कमवायला लागलो. तसं तसं माझं बकऱ्यांकडे आणि एकूणच गावाकडे जाणं कमी होत गेलं. काही दिवसांपूर्वी गावाकडची एक बातमी माझ्या कानावर आली. की गावाच्या आसपासची जमीन ही MIDC साठी गेली (aquire) आहे. त्याविरुद्ध गावातली काही मंडळी सरकारविरुद्ध लढतही आहेत. पण सरकारच ते, त्यांनी एकदा ही जमीन MIDC ला देण्याचं ठरविल्यावर, ते त्यांच्या निर्णयामध्ये किती बदल करतील हा एक प्रश्‍नच आहे.
या जमीनीमध्ये आमचे बकऱ्यांचे वाडे जिथं असतात, त्या पव्हळी जवळची जमीनही जाते आहे, अशी माहिती मला कळाली. आणि पव्हळीच्या आसपासच्या संपूर्ण जमीनीवर जर MIDC झाली, तर तिथं बकऱ्यांना खायला काही उरणारच नाही. त्यामुळे सरकारने फक्त पव्हळीची जमीन सोडून काहीच उपयोग होणार नाही.

शिवाय गेल्या एक-दोन वर्षात बऱ्याच धनगर मंडळींनी त्यांची बकरी विकून ट्रॅक्‍टर विकत घेतले आहेत. त्यामुळे एकाएकी एक विचार माझ्या मनात आला. की थोड्या दिवसांमध्ये सगळेच त्यांची बकरी विकतील, आणि हे सगळंच संपून जाईल. हा विचार मन सुन्न करणारा होता. पण हे सगळं आज ना उद्या घडणार हे निश्‍चित होतं.

आणि मग मी माझं स्वप्न पूर्ण करण्याकडे पहिलं पाऊल टाकलं. माझा खूप जवळचा मित्र हरीश कुलकर्णी आणि संतोष शिरगावकर या कोल्हापूरच्या मित्राला माझ्या माहितीपटाबद्दल सांगितलं. सगळ्या गोष्टी ठरवल्या. त्यानुसार आमचं शूटिंग पूर्ण झालं. त्यानंतर मला पुढे काय वाढून ठेवलं होतं ते माहितीच नव्हतं. माहितीपट पूर्ण करताना मला प्रचंड म्हणजे प्रचंड अडचणी आल्या. इतक्या की हा माहितीपट मी पूर्ण करू शकेन की नाही याचबद्दल माझ्या घरातले आणि मित्र यांना शंका होती. पण या सगळ्यात मी आशावादी होतो. चांगल्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रामधली नोकरी या माहितीपटासाठी सोडलेली होती. शिवाय माझं पूर्ण लक्ष या माहितीपटाच्या निर्मितीकडे असल्यामुळे माझं मन नोकरीमध्येही रमत नव्हतं. त्याच कारणामुळे मग नोकरी नाही म्हणून मी लग्नाचा विचारही पुढे ढकलत होतो.

पण माहितीपट पूर्ण करून त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवून तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना पाठवायचा हे माझं अंतिम ध्येय होतं. आणि सुरुवातच चांगली झाली. पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ५ व्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये ‘मेंढपाळ आणि मी’ या माहितीपटाला उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (छायांकनाचा) पुरस्कार मिळाला. आपण केलेल्या माहितीपटाच्या राष्ट्रीय पातळीवरील लघुपट महोत्सवात पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खरोखरच मोठी गोष्ट होती. त्यानंतर नाशिकचा अंकुर फिल्म फेस्टिवल, कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच किफ, पुण्याचा वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या मानाच्या महोत्सवात ‘मेंढपाळ आणि मी’ ची निवड झाली. शिवाय किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ मध्ये माहितीपटाच्या उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. ही खरोखरच खूप मोठी अचिव्हमेंट होती माझ्या दृष्टीने. पुण्यात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे नॅशनल फिल्म्स अर्काईव्ह म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायत ‘मेंढपाळ आणि मी’ चे स्क्रिनिंग झालं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहितीपट निर्माते दिग्दर्शक माईक पांडे यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा होता. तो फोटो मी कायम माझ्या आठवणीत ठेवणार आहे.

आणि आता सीएमएस वातावरण या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये livelihood (जीवनमान) या विभागात ‘मेंढपाळ आणि मी’ ची निवड होऊन पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. दिल्ली मध्ये आपल्या माहितीपटाचं स्क्रिनिंग होणं ही माझ्या दृष्टीने खरोखरच खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे.

शेवटी एवढंच सांगेन, माझे वडील ज्ञानेश्वर कचरे, माझी आई यशोदा कचरे आणि माझा भाऊ संतोष यांनी मला आजवर जो सपोर्ट दिलाय केवळ त्या आणि त्याचमुळे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलोय. आणि मी मनापासून पप्पा, मम्मी आणि संतोषचे आभार  मानतो, याशिवाय मी मला खूप भाग्यवान मानतो की मला असं कुटुंब मिळालंय. एकूणच ‘मेंढपाळ आणि मी’चा प्रवास सांगताना शेवटी मी एक नक्की सांगेन की काहीही झालं तरी मी माझ्या स्वतःवरचा विश्वास कमी होऊ दिला नाही. मी कायम स्वतःला विश्वास देत गेलो आणि मुख्य म्हणजे संयम ठेवत गेलो. त्यामुळेच माझ्या माहितीपटाचं आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचं यश पाहताना डोळे भरून येताहेत, आणि या यशाचं वर्णन करण्यासाठी मला शब्द कमी पडताहेत.
धन्यवाद

– अमोल ज्ञानेश्वर कचरे
(सदरचा लेख दैनिक प्रभातच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाला आहे.)

What is your reaction?
67 :thumbsup:
21 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)