प्रवासी विमान कंपन्यांना या वर्षात 14 हजार कोटींचा तोटा होणार

एकीकडे कराचा भार; दुसरीकडे तीव्र स्पर्धा

नवी दिल्ली: प्रवाशी विमान कंपन्या अनेक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे त्यांना या वर्षात 14 हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्‍यता असल्याचे समजले जात आहे. या कंपन्यांच्या सेवेच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात विमानाच्या तिकिटात वाढ होताना दिसत नाही. या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे कंपन्या या काळातही सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री करताना दिसून येत आहेत.

एक तर विमानाच्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचे दर कमी करण्यास कोणतेही राज्य किंवा केंद्र सरकार तयार नाही. त्यातच रुपयाचे मूल्य वेगाने कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांत अडचणी वाढल्या आहेत. विमानातील प्रवाशी वाढले आहेत; परंतु त्या प्रवाशांकडून अधिक दर घेण्याची युुक्‍ती या कंपन्यांना सापडलेली नाही. त्यामुळे केवळ इंडिगो कंपनी वगळता इतर कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम झाला आहे. एव्हिएशन कन्सल्टिंग फर्म सीएपीए इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वाढता खर्च आणि तुलनेने कमी तिकीट दर यामुळे एअर इंडिया आणि जेट एअरवेजसारख्या कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे.

सीएपीएने प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात रुपयाच्या मूल्यात झालेली घट आणि तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे एअरलाइन्स कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. सीएपीएने सांगितले की, तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. इंटरग्लोब एव्हिएशनची इंडिगो एअरलाइन्स वगळता इतर कुठल्याही एअरलाइन्सचा ताळेबंद मजबूत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक उद्योग वेगाने विस्तारित होत आहे. येथील एअरलाइन्स कंपन्यांनी शेकडो नव्या एअरबस एसई आणि बोईंग जेट्‌स यांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. विमानामधील सुमारे 90 टक्के जागा नेहमी बुक होत असूनही नफा मिळवण्यासाठी कंपन्यांना आटापिटा करावा लागत आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या एअरइंडियासह अन्य हवाई कंपन्यांना आपली बॅलन्सशिट वाढवण्यासाठी सुमारे 21 हजार कोटी रुपयांच्या मदतीची तातडीने आवश्‍यकता असल्याचे सीएपीएने सांगितले आहे. दरम्यान, तोट्यात असलेली सरकारी विमान कंपनी एअरइंडियाची विक्री करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, या विमान कंपनीला अद्याप खरेदीदार मिळालेला नाही. त्याचबरोबर आतापर्यंत बऱ्यापैकी चाललेल्या जेट एअरवेजला पहिल्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)