प्रवाशाला टेम्पोने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर पंक्‍चर काढण्यासाठी थांबलेल्या मोटारीला एका भरधाव टेम्पोची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. देवले गावच्या हद्दीत सोमवारी (28) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल रंगनाथ मंगसुळे (वय 40 रा. देवराष्ट्रे, ता. केडगाव, जि. सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टेम्पो चालक सतीश नामदेव झरे (वय 33, रा. नऱ्हेगाव, मुखेड, नांदेड) याला ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल एका खासगी मोटारीने (एम.एच.01/व्ही.ए.286) पुण्याहून मुंबईला जात होता. मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक 60/800 जवळ त्यांच्या मोटारीचे एक चाक पंक्‍चर झाले होते. मोटार चालकाने पंक्‍चर काढण्यासाठी वाहन सर्व्हिस लेनवर घेत पंक्‍चर काढायला सुरुवात केली. रात्र असल्याने द्रुतगती मार्गावर उजेड कमी होता, त्यामुळे अनिल हा मोटारीच्या चालकाला पंक्‍चर काढण्यासाठी मोबाईल बॅटरीचा उजेड दाखवून मदत करीत होते.

दरम्यान, मोटारीमधील अन्य चार प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने जाणे पसंत केले. मोटार चालक आणि अनिल हे दोघेच पंक्‍चर काढत होते. या दरम्यान मागून भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती टेम्पोने (एम.एच.12/जे.एफ/0318) अनिलला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पहाणी करत संबंधित मोटार चालकाला ताब्यात घेतले आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बालाजी गायकवाड तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)