प्रवाशांना गावठी कट्टा दाखवून चालक व वाहकास मारहाण

प्रवाशांना गावठी कट्टा दाखवून बस चालक व वाहकास जबर मारहाण

पुणे,दि.7 बस चालकास जबर मारहाण करुन प्रवाशांना गावठी कट्टा दाखवण्याचा प्रकार संचेती पुलावर मंगळवारी घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी चालक, वाहक, एक महिला प्रवासी व एका पुरुष प्रवाशासही मारहाण केली आहे. तसेच दगड मारुन बसच्या काचा फोडून नूकसान केले.
याप्रकरणी संदीप पगारे(30,रा.देवळालीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार मेहंदी कंबर इराणी, जमीर कंबर इराणी, हसन मुन्ना इराणी आणी त्यांच्या दोन महिला सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार ते शिवाजीनगर बस स्थानकातून नाशिकला जाण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास निघाले होते. त्यांची बस संचेती रुग्णालयाजवळ आली असता एका बुलेटस्वाराने बसला कट मारुन बुलेट आडवी घातली. यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच साईडच्या दरवाजात येऊन हाताने मारहाण करण्यास लागला. यावेळी वाहक असलेल्या संतोष काकडे याने त्यास समजाऊन सांगून बुलेटवर बसवून पाठवून दिले. बस थोडी पुढे गेल्यावर बुलेट चालक व आणखी एक जण रस्त्यात दगड घेऊन थांबले होते. त्यांनी काचेवर दगड फेकून मारल्याने काच फुटून फिर्यादीच्या बोटासही लागले. यामुळे त्यांनी बस जागेवरच थांबवली. दगड मारणारा व्यक्ती गाडीचा दरवाजा उघडत असतानाच त्याला वाहक संतोष याने पकडून ठेवले. तर दगड फेकणारा व्यक्ती पुन्हा दगड घेऊन फेकण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला प्रवाशांनी पकडून प्रकरण मिटवून पाठवून दिले. मात्र थोड्याच वेळात दगड फेकणारा मेहंदी इराणी हा सहा ते सात पुरुष व तीन ते चार इराणी महिलांना घेऊन तेथे दाखल झाला. त्यासर्वांनी मिळून फिर्यादी व वाहक संतोष याला मारहाण केली. त्याने संतोषच्या कमरेवर लाथ मारली तेव्हा एक महिला प्रवाशी मध्ये पडली. तीने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तीलाही शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. यानंतर गावठी कट्टा काढून जमीर इराणी याने प्रवाशांना दाखवत बाजूला केले. यानंतर फिर्यादी व वाहकाला जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी बस खडकी पोलीस स्टेशनला नेण्यास सांगून आरोपींना पकडून आणले. यामध्ये बसचे जवळपास 22 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर वाहकाच्या खिशातील 4 हजार 227 रुपयांचे तिकीटाचे पैसे गहाळ झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)