प्रवाशांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता

पीएमपीचे दुर्लक्ष : तीनवेळा तक्रार करुनही दखल नाही

पुणे – नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ न शकणारे पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. डेक्कन बसस्थानकावरील वेळापत्रक आणि हेल्पलाइन क्रमांकासंदर्भात एका वर्षात तीन-चार वेळा पत्रव्यवहार करुनही उपाययोजना करण्यात न आल्याने पीएमपी प्रशासन नक्की करतेय काय? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

पीएमपीच्या डेक्कन बसस्थानकावरील वेळापत्रक सुस्थितीत नाही. परिणामी, कोणती बस केव्हा सुटणार? याविषयी प्रवाशांना माहिती उपलब्ध होत नाही. तसेच, याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेला हेल्पलाइन क्रमांकही जुनाच आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानकात वेळापत्रक आणि सुरू असलेला हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करुन द्यावा, यासाठी ज्येष्ठ महिला आशा शिंदे यांनी वेळोवेळी पीएमपी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. जानेवारी ते डिसेंबर 2018 दरम्यान तीन वेळा पत्रव्यवहार करुन ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत नेहमीप्रमाणे तक्रार दाखल झाल्याची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही केली नाही. प्रशासनाच्या अशा प्रकारच्या कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष कधी देणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वेळापत्रक आणि हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करुन देण्याविषयी तीन वेळा पत्रव्यवहार केला. तक्रारीची नोंद घेऊन कार्यवाहीचे आश्‍वासनही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात काम करण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांनी केलेल्या तक्रारीला प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
– आशा शिंदे, ज्येष्ठ महिला प्रवासी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)