प्रवाशांचे यंदाही दिवाळे…

ट्रॅव्हल्सचालकांकडून लूट, आरटीओ कारवाई करेना


ऐन सणासुदीत प्रवाशांच्या खिशाला झळ

पुणे – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ऐन सणासुदीत झळ बसत असून मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी किती भाडे आकारावे, यासाठी शासनाने धोरण ठरवले असले तरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याची अंमलबजावणी होत नसल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

दिवाळी सुट्टीत रेल्वे, एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून जातात. परिणामी, नाईलाजास्तव खासगी टुर्स, ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात येत आहे. याकडे आरटीओ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. दिवाळीमध्ये नागरिक गावी जातात.

यादरम्यान एसटी, रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. याचाच फायदा घेत लूट केली जात आहे. एसटीच्या भाडेदरापेक्षा जास्तीत जास्त दीडपड भाडे आकारण्याचा अधिकार खासगी ट्रॅव्हल्सचालकांना आहे. यापेक्षा जास्त भाडेदर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचा अधिकार आरटीओ प्रशासनाला आहे. मात्र, ऐन दिवाळीत प्रशासनाकडून कारवाई थंडावली आहे.

वायूवेग पथक काय करतेय?
ऐन सणासुदीत ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. जास्तीचे भाडे आकारणे, अवैध वाहतूक आदींसाठी आरटीओचे वायूवेग पथक काम करते. मात्र, ऐन दिवाळीत पथकाकडून कारवाई केली जात नसून पथक नेमके काय करतेय, असा सवाल केला जात आहे.

अगोदर तक्रार करा, मगच तपासणी
इतरवेळी महसुलाची टंचाई भासल्यास तत्काळ अवैध प्रवासी वाहतूक, जादा भाडेदर यावर आरटीओच्या वायूवेग पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करताना तक्रार केल्यास संबंधिताची तपासणी करुन कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, स्वतःहून बसेस तपासणी करण्याची तसदी घेतली जात नाही.

असे आकारले जातायेत दर…..


पुणे – अमरावती – 2,500 ते 3,000
पुणे – औरंगाबाद – 1,200 ते 1,600
पुणे – नागपूर – 2,500 ते 3,400
पुणे – यवतमाळ – 2,400 ते 2,800


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
20 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)