प्रवाशांची लूट; ट्रॅव्हल्सचालकांना मात्र सूट!

कारवाईचा देखावा : “आरटीओ’च्या तपासणीत एकही बस दोषी नाही

पुणे – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडेआकारणी आकारणी करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ऐन सणासुदीत झळ सहन करावी लागली. मात्र, “आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रशासनाने केलेल्या तपासणीत एकही बस जादा तिकीट घेताना आढळून न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

-Ads-

दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर “आरटीओ’ने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिवाळी सुट्टीत रेल्वे, एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून जातात. परिणामी, नाईलाजास्तव खासगी टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात येते. याचा फटका दरवर्षीप्रमाणे प्रवाशांना बसला असून अनेकांना वाढीव दराने तिकीट काढून प्रवास करावा लागला. यासंदर्भात काही नागरिकांनी “आरटीओ’कडे ऑनलाइन तक्रारही केली आहे. मात्र, यासंदर्भात दिवाळीच्या अखेरच्या दिवशी तीन तपासणी पथके स्थापन करुन त्यांमार्फत दि. 10 आणि 11 नोव्हेंबरदरम्यान स्वारगेट, शिवाजीनगर, कात्रज, पुणे स्टेशन आदी परिसरांत ट्रॅव्हल्सचालकांची तपासणी करण्यात आली. मात्र, यात एकही बस जादा तिकीट आकारणारी आढळून न आल्याचे प्रशासनाने सांगितले. यामुळे हजारो प्रवाशांची लूबाडणूक झाली, तरी “आरटीओ’ प्रशासनाला एकही बस दोषी न आढळल्याने नागरिकांकडून कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“आरटीओ’ने दिखाऊ कारवाई केली असून दिवाळीच्या वेळी कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

पथकांमार्फत शहरातील विविध भागातील बसेसची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान जादा भाडे दर आकारणीसंदर्भात एकही बस आढळून आली नाही. या कारवाईदरम्यान टॅक्‍स, परवाना नसणे अशा विविध प्रकारच्या आठ बसेस आढळून आल्या असून त्यांच्याकडून करापोटी साडेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
– संजय राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)